अमेरिकन नागरिकांची फसवणूक सहा आरोपींना पोलिस कोठडी, तर उर्वरित १०९ जण हर्सूलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:28 IST2025-10-29T11:27:57+5:302025-10-29T11:28:19+5:30
आरोपींची संख्या अधिक असल्याने पोलिसांनी २०-२० जणांच्या समूहात आरोपींना न्यायालयात हजर केले.

अमेरिकन नागरिकांची फसवणूक सहा आरोपींना पोलिस कोठडी, तर उर्वरित १०९ जण हर्सूलला
छत्रपती संभाजीनगर : अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील प्रमुख सहा आरोपींना मंगळवारी रात्री उशिरा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एच. देशमुख यांनी ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. उर्वरित १०९ आरोपींना १० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावत त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली.
भावेश चौधरी, भाविक पटेल, सतीश लाडे, वलय व्यास, अजय ठाकूर आणि मनोवर्धन राठोड, अशी पोलिस कोठडी ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी टोळीतील प्रमुख आरोपींसह तब्बल ११६ जणांना ताब्यात घेतले होते. यात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश होता. यामुळे त्यास वगळून इतर आरोपींना पोलिसांनी कडक बंदोबस्तात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विशाल देशमुख यांच्या न्यायालयात रात्री १०:०० वाजता हजर केले.
याप्रसंगी लोकअभियोक्ता रविकिरण श्रृंगारे यांनी पोलिसांची बाजू मांडली. यावेळी त्यांनी हे आरोपी परप्रांतीय आहेत. कॉल सेंटरच्या माध्यमातून ते अमेरिकन नागरिकांना ऑनलाइन फसवत होते. त्यांच्या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे, त्यांनी अमेरिकन नागरिकांचा डेटा कसा मिळविला, फसवून मिळविलेले पैसे कोठे वळते केले, याविषयी सखोल तपास करायचा असल्याने प्रमुख सहा आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. उर्वरित आरोपींचा पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून तूर्तास त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती केली. पोलिसांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
मध्यरात्री १२:०० वाजेपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया
आरोपींची संख्या अधिक असल्याने पोलिसांनी २०-२० जणांच्या समूहात आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयीन कोठडी, तसेच पाेलिस कोठडी ठोठावलेल्या आरोपींचे स्वतंत्र वॉरंट तयार करण्याची प्रक्रिया मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होती. यासाठी न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.