छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये बंडखोरीचे संकेत; एकेका प्रभागातून डझनभर इच्छुक उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:09 IST2025-12-08T18:08:23+5:302025-12-08T18:09:09+5:30
भाजपच्या नूतन कार्यालयात मनपा निवडणूक इच्छुकांची फॉर्म घेण्यासाठी रविवारी गर्दी उसळली होती. यात माजी नगरसेवकांसह नवीन कार्यकर्त्यांचा समावेश होता.

छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये बंडखोरीचे संकेत; एकेका प्रभागातून डझनभर इच्छुक उमेदवार
छत्रपती संभाजीनगर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रविवारी निवडणूक मैदानात येणाऱ्या इच्छुकांची माहिती मिळण्यासाठी उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात केली. आठ तासांत ९२२ इच्छुकांनी अर्ज घेतले. एकेका प्रभागातून डझनभर इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेल्यामुळे पक्षासमोर योग्य उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे, शिवाय उमेदवारी न मिळाल्यास निर्माण होणारी नाराजी थोपविण्यात कोअर कमिटीला अपयश आले, तर बंडखोरी होण्याचे संकेतही पहिल्या दिवशीच्या गर्दीतून मिळाले आहेत.
सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत इच्छुकांना पूर्ण माहितीसह अर्ज चिकलठाणा येथील पक्ष कार्यालयात जमा करावे लागणार आहेत. भाजपच्या नूतन कार्यालयात मनपा निवडणूक इच्छुकांची फॉर्म घेण्यासाठी रविवारी गर्दी उसळली होती. यात माजी नगरसेवकांसह नवीन कार्यकर्त्यांचा समावेश होता.
भाजपने केलेली विकासकामे, पक्ष संघटन बांधणी, सततच्या कार्यक्रमांमुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी नियमित कार्यरत आहे. उमेदवारीच्या अपेक्षेने कार्यकर्ते काम करीत आहेत. त्यामुळे साहजिकच प्रत्येकाला मनपात जाण्याची इच्छा आहे; परंतु अर्ज घेण्यासाठी झालेली गर्दी पाहून उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा होण्याची चिन्हे आहेत. पहिल्या दोन तासांत ३४० अर्ज गेले. अर्जामध्ये व्यक्तिगत माहिती, पक्षातील जबाबदाऱ्या, लढलेल्या निवडणुका, सामजिक क्षेत्रातील जबाबदाऱ्या, संस्था, पदे, प्रभागातील सामाजिक समीकरणे, मतदारसंख्या व इतर माहिती विचारण्यात आली आहे.
योग्य उमेदवार देण्याचे आव्हान...
पहिल्या दिवशी आठ तासांत ९२२ इच्छुकांनी अर्ज नेले. सोमवारी सायंकाळपर्यंत अर्ज जमा करावे लागतील. पक्षातील जबाबदारी, आजवर केलेले काम व इतर माहिती अर्जातून विचारण्यात आली आहे. एकेका प्रभागात ९ ते १२ जण इच्छुक आहेत. निकोप स्पर्धा असून, योग्य उमेदवार देण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.
- किशोर शितोळे, शहराध्यक्ष भाजप
प्रभागांचे वर्गीकरण...
भाजपने प्रभागांचे ए, बी, सी, डी असे वर्गीकरण केले आहे. १२ प्रभागांत भाजप ए वर्गात आहे. म्हणजे या ठिकाणी पक्ष संघटन चांगले असून, येथील उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. बी, सी आणि डी या वर्गात मोडणाऱ्या प्रभागांबाबत भाजप साशंक आहे. उमेदवारांची गर्दी देखील ए वर्गातील प्रभागात आहे. उर्वरित वर्गांमध्ये नाही.