भावकीच्या वादांचा परिणाम मुलांवर होऊन अघटित घडल; चुलत भावांच्या मृत्यूचे गूढ उलगडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:33 IST2025-08-20T13:32:10+5:302025-08-20T13:33:18+5:30

लहान भावाचा खून झाल्यानंतर तीन दिवसांनी मोठ्या चुलत भावाचा देखील मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली

Sibling disputes affect children and lead to untold tragedy; Mystery of cousins' deaths revealed | भावकीच्या वादांचा परिणाम मुलांवर होऊन अघटित घडल; चुलत भावांच्या मृत्यूचे गूढ उलगडलं

भावकीच्या वादांचा परिणाम मुलांवर होऊन अघटित घडल; चुलत भावांच्या मृत्यूचे गूढ उलगडलं

गंगापूर : तालुक्यातील मुद्देश वाडगाव येथील दोन चुलत भावांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले. लहान चुलत भाऊ सिद्धार्थचा खून केल्यानंतर पोलिस तपासात आपण सापडले जाऊ, या भीतीनेच आरोपी स्वप्नील चव्हाणने १८ ऑगस्ट रोजी स्वतः आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन कुटुंबात भावकीचा वाद असताना काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये जांभळावरुन किरकोळ भांडण झाले होते.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बिस्कीट आणण्यासाठी गावात जाणाऱ्या बारा वर्षीय सिद्धार्थ विजय चव्हाण या शाळकरी मुलाचा खून झाल्याची घटना मुद्देश वाडगाव शिवारात १४ ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेच्या तीन दिवसांनंतर सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास सिद्धार्थचा चुलत भाऊ स्वप्नील संजय चव्हाण (वय २२) याचा मृतदेह देखील मुद्देश वाडगाव शिवारातील विहिरीत आढळला होता.

सिद्धार्थ व स्वप्नीलच्या वडिलांमध्ये भावकीतील वाद होता. हा वाद काही महिन्यांपूर्वी पोलिसांच्या मध्यस्थीने मिटविण्यात आला होता; मात्र दोन्ही भावांतील वादाचा परिणाम त्यांच्या मुलांवर झाला होता. त्यामुळे सिद्धार्थ व स्वप्नील यांच्यात अधूनमधून खटकेदेखील उडत होते. यातूनच काही दिवसांपूर्वी स्वप्नील व सिद्धार्थ या चुलत भावांमध्ये जांभळावरून किरकोळ भांडणदेखील झाले होते. या रागातूनच स्वप्नीलने १४ ऑगस्ट रोजी गावात बिस्कीट आणायला जाणाऱ्या आपल्या बारा वर्षीय चुलत भावाला संपवले होते. याचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते; मात्र यादरम्यान १६ ऑगस्ट रोजी सकाळी स्वप्नील बेपत्ता झाला होता. त्याचा पोलिस शोध घेत असताना १८ ऑगस्ट रोजी गावातील शिवारातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला होता.

पकडले जाण्याच्या भीतीने संपविले जीवन
सिद्धार्थच्या खुनाच्या गुन्ह्यात आपण पकडले जाणार हे स्वप्नीलला कळून चुकले होते. त्यामुळेच त्याने विहिरीत आत्महत्या करून स्वतःला संपवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे तपास अधिकारी पोनि कुमारसिंग राठोड यांनी सांगितले. सदरील गुन्ह्याची उकल करण्यामध्ये गंगापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विजयसिंग राजपूत यांच्या पथकाने मेहनत घेतली.

Web Title: Sibling disputes affect children and lead to untold tragedy; Mystery of cousins' deaths revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.