नगरपरिषद निवडणुकीनंतर मंत्री शिरसाट-जिल्हाध्यक्ष जंजाळ वाद श्रीकांत शिंदे मिटवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 19:21 IST2025-11-28T19:20:01+5:302025-11-28T19:21:38+5:30
दोन्ही गटांच्या नाराजीची माहिती घेतली; श्रीकांत शिंदे शहरात पुन्हा येणार

नगरपरिषद निवडणुकीनंतर मंत्री शिरसाट-जिल्हाध्यक्ष जंजाळ वाद श्रीकांत शिंदे मिटवणार
छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संजय शिरसाट आणि शिंदेसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री शहरात आलेले खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही नेत्यांची भेट घेतली. या वादावर ते नगरपरिषद निवडणुकीनंतर तोडगा काढणार आहेत. याकरिता ते पुन्हा शहरात येऊन सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
पालकमंत्री शिरसाट हे आपल्याला विश्वासात न घेता पक्षाच्या बैठका घेतात. त्यांनी परस्पर शहर कार्यकारिणीची यादी तयार करून मंजुरीसाठी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविल्याचा आरोप जंजाळ यांनी केला होता. शिरसाट यांनीही त्यांना कोणत्या पक्षात जायचे ते खुशाल जा, असे सुनावले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. खा. डॉ. शिंदे यांच्या स्वागतासाठी जंजाळ हे पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते. गुरुवारी सकाळी ते पालकमंत्री शिरसाट यांच्यासोबत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी परजिल्ह्यात रवाना झाले. शिरसाट आणि डॉ. शिंदे दिवसभर एकत्र होते. जंजाळ आणि शिरसाट यांच्यातील वादावर ते नगरपरिषद निवडणुकीनंतर येथे येऊन तोडगा काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पदाधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही पक्षाचे काम करीत आहोत. पालकमंत्री आपल्याला डावलतात आणि पदाधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात, ही बाब डॉ. शिंदे यांना समजली आहे. त्यांनी याविषयी नगरपरिषद निवडणुकीनंतर तोडगा काढणार असल्याचे सांगितले.
- राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना
जंजाळांनी वादाला सुरुवात केली
गुरुवारी दिवसभर मी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत नगरपरिषद निवडणूक प्रचारासाठी होतो. मात्र, आमच्या वादावर कोणतीही चर्चा झाली नाही. जंजाळांनी वादाला सुरुवात केली आहे, यामुळे त्यांनीच हा वाद मिटवावा.
- संजय शिरसाट, पालकमंत्री