महापालिकेचे कुणी वाटोळे केले ते दाखवून देऊ; शिवसेनेचे भाजपला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 18:24 IST2020-03-02T18:21:17+5:302020-03-02T18:24:06+5:30
भाजपनेही आमच्यासोबत सत्ता उपभोगल्याचा त्यांना विसर पडला आहे

महापालिकेचे कुणी वाटोळे केले ते दाखवून देऊ; शिवसेनेचे भाजपला आव्हान
औरंगाबाद : शिवसेनेने शहराची वाट लावली असून त्यांना हद्दपार करा, असे आवाहन करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केलेल्या टीकेला शिवसेनेने खुले आव्हान देऊन आमने-सामने करा, कुणी वाटोळे केले ते दाखवून देऊ, असे प्रत्युत्तर शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा तोल गेला आहे, अशी टीकाही घोसाळकर यांनी केली.
शनिवारी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा होता. त्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासह सर्वांनीच शिवसेनेवर हल्ला चढविला. भाजपने केलेल्या टीकेचा समाचार घोसाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना घेतला. मागील पाच वर्षे राज्यात दोन्ही पक्षांची युती होती. त्यावेळी सगळे चांगले होते. शिवाय ३० वर्षांत जेव्हा महापालिकेत सत्तेसाठी धोरणे आखली गेली, त्यावेळीही भाजप सोबत होता. सत्तेचा बरोबरीने वाटा घेताना आठवले नाही काय, कुणी काय केले. ही बेगडीपणाची भाषा भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी करू नये, असे ते म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ कुणी काय केले, तसेच समोरासमोर या, त्यांच्या महापौरांची कारकीर्द काढा आणि त्यांच्या महापौरांची कारकीर्द काढा, असे आव्हानही त्यांनी दिले.