धक्कादायक ! मुंबईवरून पायी खुलताबादेत आलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:50 IST2020-05-08T16:49:51+5:302020-05-08T16:50:09+5:30
नगर परिषदेच्या कर्मचा-यांनी त्याला लागलीच तपासणीसाठी पाठविले

धक्कादायक ! मुंबईवरून पायी खुलताबादेत आलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह
औरंगाबाद : तीन दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या एक तीस वर्षीय तरुण कोरोना पॉझीटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने खुलताबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राजीव गांधी नगरमध्ये तरुण राहत असलेल्या घरा बाजूचा परिसर सील करण्यात आला असून आरोग्य पथक दाखल झाले आहे.
तहसीलदार राहुल गायकवाड , वैद्यकिय अधीक्षक डॉ. सुहास जगताप, पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी खुलताबाद येथील राजीवगांधीनगर मधील त्या घराचा परिसर सील केला आहे. प्रशासन संबधीत रूग्णांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती घेत आहे.
दरम्यान, हा तरुण मुंबईहून पायी चालत खुलताबाद येथे आला. याची माहिती मिळताच नगर परिषदेच्या कर्मचा-यांनी त्याला लागलीच तपासणीसाठी पाठविले होते. यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.