धक्कादायक ! सर्वजण शेत कामात व्यस्त असताना एकुलत्या एक मुलाने घरी गळफास घेऊन जीवन संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 14:09 IST2021-03-15T14:09:08+5:302021-03-15T14:09:26+5:30
मुलाचे वडील संतोष सारंगधर हे मुलाला (हृतिक) गहू बांधण्यासाठी शेतात ये असे म्हणत सकाळीच शेतात निघून गेले.

धक्कादायक ! सर्वजण शेत कामात व्यस्त असताना एकुलत्या एक मुलाने घरी गळफास घेऊन जीवन संपवले
गल्ले बोरगाव : गल्ले बोरगाव येथील (ता. खुलताबाद) १८ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. हृतिक संतोष सारंगधर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हृतिक सारंगधर याच्या शेतात रविवारी गहू सोंगणीचे काम चालू होते. त्यामुळे वडील संतोष सारंगधर हे मुलाला (हृतिक) गहू बांधण्यासाठी शेतात ये असे म्हणत सकाळीच शेतात निघून गेले. काही वेळानंतर हृतिकच्या आजीने त्याला आवाज देऊन घराबाहेर बोलावले; परंतु त्याने प्रतिसाद न दिल्याने आजीने घरात जाऊन पाहिले तर हृतिकने आतून कडी लावलेली आढळून आली. तो अनेक आवाज देऊनही दरवाजा उघडत नसल्याने आजीने तातडीने शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी सुद्धा त्यास अनेक आवाज दिले. शेवटी दरवाजा उघडेना म्हणून त्यांनी तोडल्यानंतर हृतिकने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून आजीने हंबरडा फोडला.
या घटनेची माहिती मिळताच सरपंच विशाल खोसरे, पोलीस पाटील, माजी उपसरपंच संजय भागवत, हृतिकच्या नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. संबंधितांनी मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी तात्काळ वेरूळ येथील प्रथम आरोग्य केंद्रात पाठिवण्यात आला. संतोष सारंगधर यांना हृतिक एकुलता एक मुलगा होता. खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादर राम छत्रे, मनोहर पुंगळे हे करत आहेत.