धक्कादायक! वाल्मीच्या महासंचालकांना बैठकीतच ठेकेदाराकडून धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:20 IST2025-04-24T13:19:11+5:302025-04-24T13:20:01+5:30

तत्कालीन महासंचालक नाथ, ठेकेदार चव्हाण यांच्यावर सदर गेस्ट हाऊस प्रकरणातच १ कोटी ९३ लाख रुपयांचा अपहार केल्याचा ठपका

Shocking! WALMI's Director General was pushed and beaten by a contractor in a meeting | धक्कादायक! वाल्मीच्या महासंचालकांना बैठकीतच ठेकेदाराकडून धक्काबुक्की

धक्कादायक! वाल्मीच्या महासंचालकांना बैठकीतच ठेकेदाराकडून धक्काबुक्की

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाच्या अनुषंगाने वाल्मीत सुरू असलेल्या बैठकीतच एका ठेकेदाराने महासंचालक तथा आयएएस अधिकारी प्रकाश खपले (५५) यांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. राजेश चव्हाण (रा. प्रकाशनगर) याच्यावर याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मृद व जलसंधारण विभागाचे आयुक्त प्रकाश खपले यांच्याकडे जानेवारी २०२५ पासून वाल्मीच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार आहे. २२ एप्रिलला दुपारी ४:३० वाजता विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाबाबत खपले यांच्या दालनात बैठक सुरू होती. चव्हाणने दालनात प्रवेश करत वाल्मीतील त्याचे पोकलँड परत करण्याची मागणी केली. तसेच त्याला मिळालेले विभागाच्या गेस्ट हाऊसच्या नूतनीकरणाचे काम करू देण्याची मागणी केली. खपले यांनी चव्हाणला सदर काम रद्द झाले असून, कामाचे १.९३ कोटी रुपये अग्रीम रक्कम परत करण्याची सूचना केली. त्यावरून त्यांच्यात वाद उफाळून आले. चव्हाणने संतप्त होत शिवीगाळ सुरू केली. तुम्हाला हे भारी पडेल, अशी धमकी देत त्यांच्या अंगावर धावून गेला. चव्हाण यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला पकडून दालनाबाहेर काढले. त्यानंतर खपले यांनी स्वत: चव्हाण विरोधात तक्रार दिली.

गेस्ट हाऊसचा वाद काय ?
चव्हाणच्या दाव्यानुसार, तत्कालीन महासंचालक नाथ यांच्या कार्यकाळात त्यांना टेंडरद्वारे वाल्मी गेस्ट हाऊसच्या नूतनीकरणाचे कंत्राट मिळाले होते. त्यासाठी त्यांना अग्रीम रक्कम म्हणून १ कोटी ९३ लाख प्राप्त झाले होते. खपले यांच्या माहितीनुसार, सदर गेस्ट हाऊसची इमारत ५० वर्षे जुनी आहे. त्यामुळे त्याचे नूतनीकरण आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसून त्यासंबंधाने नियुक्त समितीने शासनाला अहवाल दिला आहे.

दोघांवर अपहाराचा ठपका
तत्कालीन महासंचालक नाथ, ठेकेदार चव्हाण यांच्यावर सदर गेस्ट हाऊस प्रकरणातच १ कोटी ९३ लाख रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवत विभागाने सातारा पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्याचा तपास सुरू असल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले.

Web Title: Shocking! WALMI's Director General was pushed and beaten by a contractor in a meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.