धक्कादायक! गतिमंद विद्यार्थ्यांचे हात बांधून शिपायांची मारहाण, दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:29 IST2025-11-03T13:28:15+5:302025-11-03T13:29:27+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका दिव्यांगांच्या शाळेतील २ मुलांना मारल्याची घटना समोर आलेली असतानाच नारेगाव परिसरात पुन्हा एका गतिमंद मुलाला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! गतिमंद विद्यार्थ्यांचे हात बांधून शिपायांची मारहाण, दोघांवर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील एका निवासी मतिमंद विद्यालयात शिकणाऱ्या गतिमंद विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेतील शिपाई व काळजीवाहकानेच मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी दीपक गाेविंद इंगळे (रा. मांडकी) व प्रदीप वामन देहाडे (रा. केराळा, ता.सिल्लोड) या दोघांवर चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सखाराम पोळ (६०, रा. कैलासनगर) यांनी याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीतील आरोपानुसार, जून ते ऑक्टोबर, २०२५ दरम्यान आरोपींनी शाळेतील दोन विद्यार्थ्यांना नाहक मारहाण केली. हात बांधून, हाताचापटाने मारहाण करुन आरोपी दीपकने तव्याने आणि कुकरच्या झाकणाने देखील एका विद्यार्थ्यावर वार केले. ही बाब उघडकीस येताच पोळ यांनी तक्रार केली.
आणखी एका गतिमंद मुलाला मारहाण केल्याचे प्रकरण उघड
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका दिव्यांगांच्या शाळेतील २ मुलांना मारल्याची घटना समोर आलेली असतानाच नारेगाव परिसरात पुन्हा एका गतिमंद मुलाला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या घटनेत चौकशी करून पोलिसांनी ३० ऑक्टोबर रोजी याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल केला.
१० वर्षीय मुलाच्या ३७ वर्षीय वडिलांनी याप्रकरणी तक्रार केली होती. तक्रारदाराला ३ मुले असून त्यांचा १० वर्षांचा मुलगा गतिमंद आहे. तो एका दिव्यांगांच्या शाळेत शिक्षण घेतो. त्यांचा १२ वर्षीय मुलगा आजारी असल्याने गतिमंद मुलगा काही दिवस आजी - आजोबांकडे राहण्यास होता. १२ सप्टेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे बसने शाळेत गेला. सायंकाळी ५ वाजता घरी आल्यावर मात्र त्याच्या पाठीवर मारहाण केल्याचे व्रण होते. ही बाब कळताच वडिलांनी शाळेतील शिक्षकांना संपर्क केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. रुग्णालयात धाव घेत त्यांनी मुलावर उपचार घेतले. त्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांकडे चौकशीसाठी अर्ज केला. त्यांच्या मुलाला मारहाण, बसमधून घरी येईपर्यंत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक जगन्नाथ मेंदकुदळे अधिक तपास करत आहेत.