खासदार निधीतून कंत्राट देतो, आमिष देत ५६ लाखांची फसवणूक; हवाल्यामार्फत घेतली रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:11 IST2025-03-25T16:10:50+5:302025-03-25T16:11:09+5:30

मनपाची अपक्ष निवडणूक लढलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तिघांकडून गंडा; वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल

Shocking! Retired officer cheated of Rs 56 lakhs by promising to award contract from MP fund | खासदार निधीतून कंत्राट देतो, आमिष देत ५६ लाखांची फसवणूक; हवाल्यामार्फत घेतली रक्कम

खासदार निधीतून कंत्राट देतो, आमिष देत ५६ लाखांची फसवणूक; हवाल्यामार्फत घेतली रक्कम

छत्रपती संभाजीनगर : राज्यसभा खासदारांच्या निधीच्या कामांचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून निवृत्त अधिकाऱ्याला तिघांनी चार वर्षांत ५६ लाखांचा गंडा घातला. भारत राजू शेंडगे (रा. केसरसिंगपुरा), ज्योतिका पवार, अश्विन जाधव यांच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तुषार बासनीवाल (रा. पदमपुरा) यांचे वडील कृष्णलाल बासनीवाल जिल्हा उद्योग केंद्रातून निवृत्त झाले आहेत. त्यांनी २०१५ मध्ये मनपाची अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तेव्हा शेंडगे त्यांच्या संपर्कात आला. त्याने राज्यसभेचे खा. डॉ. भागवत कराड यांचा मुलगा हर्षवर्धन यांच्यासोबत चांगला परिचय असून, मामा कराड यांच्या गाडीवर चालक असल्याचे सांगितले. तुषार यांनी सा. बां. विभागातून बांधकाम सुपरवायझरचा परवाना काढलेला होता. २०२२ मध्ये शेंडगेने त्यांना परवान्यावर खासदार निधीतून काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. प्रक्रियेच्या नावाखाली त्यांच्याकडून ३२ हजार रुपये उकळले. सप्टेंबर २०२३ मध्ये खासदारांच्या निधीतून १ कोटीची कामे मिळाल्याचे सांगत जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्याचे काम दाखवून पुन्हा पैसे उकळले. बासनीवाल त्याला वारंवार वर्कऑर्डरची मागणी करत होते. शेंडगे मात्र त्यांना टाळत गेला.

साहेबांच्या नावाने महिलेचाही कॉल
३० सप्टेंबर, २०२३ रोजी ज्योतिका पवार नामक महिलेने कॉल करून ‘साहेबांच्या कार्यालयातून’ बोलत असल्याचे सांगितले. तिच्या सांगण्यावरून तक्रारदाराने शेंडगेला २७ हजार रुपये दिले. त्यावेळी त्याच्यासोबत कुणाल गायकवाड नावाची व्यक्ती होती. आणखी ७ वर्कऑर्डरचे कारण देऊन शेंडगेने त्यांच्याकडून ६ डिसेंबर २०२३ रोजी १५ लाख रुपये उकळून नूतन कॉलनीतील कार्यालयात जाण्याचे नाटकही केले.

हवालाद्वारे पैशांची देवाणघेवाण
शेंडगेने जानेवारी २०२४ नंतर हवालाद्वारे पैसे स्वीकारले. जवळपास १७ व्यक्ती आणि अनोळखी कंपनीच्या नावे १२ लाख ४३ हजार रुपये स्वीकारले. १२ सप्टेंबर २०२४ रोजी त्याचा साथीदार अश्विन जाधवने त्यांना पैसे देण्याचे आमिष दाखवले. २५ सप्टेंबर २०२४ रोजी अखेर बासनीवाल यांनी कराड यांच्या कार्यालयात जाऊन खातरजमा केली. तेव्हा खासदारांचे स्वीय सहायक यश देवकर यांनी शेंडगेला कुठलेही काम दिलेले नसून तुम्हाला खोटे सांगितले गेल्याचे सांगितले. तोपर्यंत शेंडगेने त्यांच्याकडून ५६ लाख ३८ हजार रुपये उकळले होते.

Web Title: Shocking! Retired officer cheated of Rs 56 lakhs by promising to award contract from MP fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.