पोलिसांच्या वसाहतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन पोलिस पत्नीने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:02 IST2025-10-03T19:01:11+5:302025-10-03T19:02:00+5:30
कौटुंबिक छळामुळे मुलीने आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल करण्यासाठी बेगमपुरा पोलिस ठाण्यात ठिय्या

पोलिसांच्या वसाहतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन पोलिस पत्नीने संपवलं जीवन
छत्रपती संभाजीनगर : पोलिस आयुक्तालयातील पोलिस वसाहतीत राहणारे पोलिस कर्मचारी समीर शेख यांची पत्नी सबा समीर शेख (वय अंदाजे २२) यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी ०३:०० वाजता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
मूळ निफाड तालुक्यातील कसबे सुकेने गावातील शेतकरी कुटुंबातील सबाचा अडीच वर्षांपूर्वी समीरसोबत विवाह झाला होता. जिन्सी ठाण्यात कार्यरत समीर खेळाडू म्हणून पोलिस मुख्यालयाला संलग्न आहे. पोलिस वसाहतीमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पत्नीसोबत राहत होता. बुधवारी सकाळी ११:०० वाजता सबाच्या माहेरच्यांना समीरने संपर्क करून तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्याच्या काही वेळात पुन्हा कॉल करून सबाला चक्कर आली असून, रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. ही बाब कळताच सबाचे काका अनिस नवाब शेख यांनी नातेवाइकांसह शहरात धाव घेतली. मात्र, त्यांना थेट सबाचा मृतदेहच दाखवण्यात आला. घटनेची माहिती कळताच बेगमपुरा पोलिसांनी धाव घेतली. गुरुवारी दुपारी घडलेल्या घटनेत रात्री उशिरापर्यंत सबाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले नव्हते.
मोबाइल वापरण्यासदेखील होती मनाई
पोलिसांच्या माहितीनुसार, सबा यांचा थेट जमिनीवर गंभीर जखमी अवस्थेत मृतदेह आढळला. तिच्या माहेरच्यांनी समीरच्या छळामुळेच तिने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप केला. तिचे काका अनिस यांनी केलेल्या आरोपानुसार, सततच्या मानसिक, शारीरिक छळामुळे सबा माहेरी आली होती; परंतु ज्येष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर सबा पुन्हा पतीसह राहत होती. अनेकदा तिला माहेरच्यांसोबत बोलू दिले जात नव्हते. त्यामुळेच तणावाखाली जाऊन तिने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
रात्री ठाण्यात ठिय्या
सबाच्या आत्महत्येमुळे माहेरच्या संतप्त कुटुंबीयांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत समीरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यांची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.