मुंडके उडवलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले; कवटीतील ‘जॉ फ्रॅक्चर क्लिप’ मुळे आरोपी सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 15:54 IST2025-09-13T15:53:26+5:302025-09-13T15:54:04+5:30

गौताळा अभयारण्यातील खून प्रकरणात धक्कादायक खुलासा;दोन जिवलग मित्रांच्या जीवघेण्या झटापटीत एकाने उडवले दुसऱ्याचे मुंडके !

Shocking! Mystery of decapitated body solved; Accused found due to 'jaw fracture clip' in skull | मुंडके उडवलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले; कवटीतील ‘जॉ फ्रॅक्चर क्लिप’ मुळे आरोपी सापडला

मुंडके उडवलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले; कवटीतील ‘जॉ फ्रॅक्चर क्लिप’ मुळे आरोपी सापडला

छत्रपती संभाजीनगर : कुजलेल्या अवस्थेत मुंडके उडवलेले धड गौताळा अभयारण्यात आढळले होते. जवळच सापडलेल्या कवटीतील 'जॉ फ्रॅक्चर क्लिप' वरून पोलिसांनी सात दिवसांत मृतदेहाची ओळख पटवून या क्रूर हत्येचा उलगडा केला. निखिल हिरामण सूर्यवंशी (वय २८ रा. सिंदी ता. चाळीसगाव) असे मृ़ताचे नाव असून, त्याचा जिवलग मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर यानेच खून केल्याचे निष्पन्न झाले.

३ सप्टेंबर रोजी गौताळा अभयारण्यात हे शव सापडले. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी पाच पथके तयार करून तपास सुरू केला. सखोल तपासात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात एका तरुणाच्या बेपत्ता असल्याची नोंद दिसली. पथकाने कुटुंबाशी संपर्क साधल्यानंतर निखिलची ओळख पटली.

'जॉ फ्रॅक्चर क्लिप' आणि एआयच्या मदतीने हत्येचा उलगडा
कवटीच्या जबड्यामध्ये एक क्लिप आढळली. पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांनी तत्काळ या 'जॉ फ्रॅक्चर क्लिप' ची माहिती घेण्यास सांगितले. सदर क्लिप गुजरातमध्ये तयार होतात. तुटलेल्या हाडांना योग्य जागी स्थिर ठेवण्यासाठी वापरतात.
-त्यावरून पोलिसांनी चाळीसगाव, कन्नड, जळगाव, धुळ्यात ३८ रुग्णालयांत भेट देत अशा क्लिप बसवलेल्या रुग्णांची माहिती घेतली.
-जुलै, २०२३ मध्ये घोटीच्या एसएमबीटी रुग्णालयात अपघातात जबड्याला दुखापत झाल्याने निखिलवर शस्त्रक्रिया झाल्याचे निष्पन्न झाले. बेपत्ता तरुणाच्या माहितीशी ही बाब जुळली व पोलिस निखिलच्या कुटुंबापर्यंत पोहोचले.

तो मित्र कोण ?
निखिल रोजंदारीवर शेतमजुरी करत होता. बकऱ्या चोरून गावात गुंडगिरीही करत होता. श्रावण त्याचा जिवलग मित्र होता. निखिलचे सर्व मित्र पोलिसांसमोर आले. मात्र, श्रावण येत नव्हता. पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. उलट तपासणीत श्रावण गडबडला आणि त्याने हत्येची कबुली दिली. २६ ऑगस्ट रोजी मैत्रिणीला भेटायचे असल्याचे सांगून निखिल त्याला दुचाकीने सायगावमार्गे सनसेट पाॅइंटजवळ घेऊन गेला होता. ‘मी चोऱ्या, गुंडगिरी, व्यसन करतो. तुला माझे सर्व कुकर्म माहिती असल्याने माझी बदनामी होते. तू मेलास तरच माझे लग्न होईल, त्यामुळे तुला मारायचे आहे, असे म्हणत निखिलने त्याच्यावर कुऱ्हाड उपसली. मात्र, श्रावणने वार चुकवत त्याच्या गुप्तांगावर लाथ मारली. तो कोसळताच श्रावणने त्याच कुऱ्हाडीने निखिलचे शीर धडापासून वेगळे केले.

यांनी केली कारवाई
उपअधीक्षक डॉ. दिनेशकुमार कोल्हे, पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक निरीक्षक संतोष मिसळे, पवन इंगळे, अंमलदार प्रमोद पाटील, वाल्मीक निकम, विठ्ठल डोके, शिवानंद बनगे, अशोक वाघ, गोपाळ पाटील, प्रशांत नांदवे, महेश बिरुटे, समाधान दुबीले, दीपक सुरोसे, बलवीरसिंग बहूरे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे, नीलेश कुडे, कविता पवार, बलवरसिंग बहुरे, प्रमोद पाटील.

Web Title: Shocking! Mystery of decapitated body solved; Accused found due to 'jaw fracture clip' in skull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.