धक्कादायक ! सासरच्यांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्याने जावयाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 13:54 IST2021-07-21T13:53:07+5:302021-07-21T13:54:36+5:30
सासरच्या लोकांनी अमानुष मारहाणीचा व्हिडिओ तरुणाच्या व इतर नातेवाईकांच्या मोबाईलवर शेअर केला.

धक्कादायक ! सासरच्यांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्याने जावयाचा आत्महत्येचा प्रयत्न
सिल्लोड ( औरंगाबाद ) : बायकोला नांदवत नाही म्हणून जावयाला सासरच्या लोकांनी बोलावून घेतले. यानंतर जाब विचारून पाईपने अमानुष मारहाण करत त्याच्या गुप्तांगात मिरची पूड टाकल्याची धक्कादायक घटना ८ जुलैला घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जावयाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सासरच्या ११ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील उंडणगाव येथे राहणाऱ्या एका तरुणाचे पत्नीसोबत मतभेद आहेत. त्यामुळे पत्नी बुलढाणा येथील माहेरी असते. मुलीला नांदवत नाही म्हणून सासरच्या लोकांनी जावयाला घरी बोलावून घेतले. यानंतर जाब विचारात सासरच्यांनी वायर, सळईने त्याला बेदम मारहाण केली. यावरच न थांबता त्याच्या गुप्तांगात मिरची पूड टाकून सासरच्यांनी अमानुष मारहाण केली. याप्रकरणी ८ जुलै रोजी सासरच्या ११ लोकांविरुद्ध बुलढाणा जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आला.
यानंतर तरुण उंडणगाव येथे परतला. मात्र, सासरच्या लोकांनी अमानुष मारहाणीचा व्हिडिओ तरुणाच्या व इतर नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठवला. व्हिडिओ व्हायरल व्होउन बदनामी झाल्याने तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले. यातूनच उंडणगाव येथे १६ जुलै रोजी त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी जुन्नर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तरुणाच्या मामाने सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात ४ जण अटकेत असून इतर ७ फरार आहेत.पोलीस पुढील तपास करत आहेत. अमानुष मारहाण सहन केल्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तरुण मृत्यूच्या दाढेत उभा असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.