संतापजनक! मित्रासोबत फिरणाऱ्या तरुणीस टवाळखोरांकडून त्रास, मोबाईल हिसकावला
By राम शिनगारे | Updated: April 26, 2023 13:12 IST2023-04-26T13:11:10+5:302023-04-26T13:12:01+5:30
पीडिता, पालकांची तक्रार देण्यास नकार; घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस याप्रकरणी स्वतः तक्रारदार झाले आहेत

संतापजनक! मित्रासोबत फिरणाऱ्या तरुणीस टवाळखोरांकडून त्रास, मोबाईल हिसकावला
छत्रपती संभाजीनगर: मित्रासोबत फिरणाऱ्या एका तरुणीस टोळक्याने त्रास दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ही संतापजनक घटना २४ एप्रिल रोजीची बिबी-का-मकबरा परिसरातील असल्याची माहिती आहे. दरम्यान, याप्रकरणी पिडीत तरुणी आणि तिच्या पालकांनी तक्रार देण्यास नकार दिल्याचे समजते.
पोलिसांच्या तपासात हा व्हिडिओ बिबी-का-मकबरा परिसरातील असल्याचे पुढे आले. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, एक तरुणी घाईघाईने पुढे जात असून काही टवाळखोर तिला त्रास देत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. एक तरुणी मित्रासोबत या परिसरात फिरण्यासाठी आली होती. याचवेळी एका टोळक्याने तरुणीस त्रास देणे सुरु केले. तरुणी तेथून जात असताना टोळक्याने पाठलाग केला. एकाने तर झटापट करत तिचा मोबाईल हिसकावून घेतला. मला सोडा म्हणून ओरडत तरुणी प्रतिकार करत होती. मात्र, टवाळखोर अधिक त्वेषाने तिला त्रास देत होते. काहीजण मोबाईलमध्ये व्हिडिओ करत होते.
पोलीस स्वतः झाले तक्रारदार, तिघे ताब्यात
दरम्यान, बेगमपुरा पोलिसांनी पिडीत मुलगी आणि तिच्या पालकांना स्टेशनमध्ये बोलावून घेत तक्रार देण्यास सांगितले. मात्र, त्यांनी तक्रार देण्यात नकार दिला. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस स्वतःहून तक्रारदार होत कारवाई करत आहेत, अशी माहिती डीसीपी दीपक गीऱ्हे यांनी दिली आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी एकास तर बेगमपुरा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.