धक्कादायक! गावातील युवकाकडून अल्पवयीन विवाहितेचे अपहरण, पुण्यात नेऊन अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 14:55 IST2025-07-19T14:45:54+5:302025-07-19T14:55:01+5:30
या गंभीर प्रकरणाचा तपास वाळूज एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

धक्कादायक! गावातील युवकाकडून अल्पवयीन विवाहितेचे अपहरण, पुण्यात नेऊन अत्याचार
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथे पतीसोबत वास्तव्यास असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन विवाहितेला एका युवकाने धमकावून पुण्यात नेले आणि तिथे जबरदस्ती केली. या प्रकरणी शुक्रवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेचे नुकतेच लग्न झाले असून ती पतीसोबत वाळूज परिसरात वास्तव्यास आहे. मात्र, गावातील ओळखीचा युवक महादेव रामकिशन मुंढे (वय २५, रा. सोमणवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड) हा तिच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. तिने नकार देऊनही तो वारंवार फोन करून तिला त्रास देत होता. दि.१६ जुलै रोजी दुपारी एक वाजता तो तिच्या राहत्या घराबाहेर येऊन "माझ्यासोबत चल, नाही तर गोंधळ घालीन," अशी धमकी देत तिला सोबत नेले. त्यावेळी त्याच्यासोबत गणेश दत्तात्रय सोनवणे होता. त्यानंतर त्यांनी तिला पंढरपूरहून पिंपरी-चिंचवड येथे नेले. तेथे मुंढेच्या मित्रांनी त्यांना एका फ्लॅटमध्ये थांबवले.
या फ्लॅटमध्ये मुंढेने तीन वेळा बलात्कार केला. आरोपीने पीडितेला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ती गप्प राहिली. आरोपीचे मित्र ऋषिकेश मुंढे (वय २३) व ओमकेश गिरी (वय २३) यांचाही या प्रकारात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. १७ जुलै रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे आणून तिला सोडण्यात आले. घडलेली घटना पोलिसांत कळवताच मुंढे, सोनवणे, ऋषिकेश मुंढे व ओमकेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर प्रकरणाचा तपास वाळूज एमआयडीसी पोलिस करीत आहेत.