शेतात कापूस वेचण्यास जाणाऱ्या महिलेस लुटले, चोरट्यांनी कर्णफुले ओरबाडल्याने महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:55 IST2025-12-11T17:54:56+5:302025-12-11T17:55:00+5:30
पैठण तालुक्यातील घटना, कुटुंबीय येईपर्यंत चोरटे पसार

शेतात कापूस वेचण्यास जाणाऱ्या महिलेस लुटले, चोरट्यांनी कर्णफुले ओरबाडल्याने महिला जखमी
दावरवाडी: शेतात कपाशी वेचण्यासाठी जाणाऱ्या एका महिलेला दोन चोरट्यांनी निर्जनस्थळी गाठून जीवे मारण्याची धमकी देत अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून नेल्याची घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी-सोनवाडी मार्गावर बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. यावेळी चोरट्यांनी सदरील महिलेची कर्णफुले ओरबाडल्याने ती जखमी झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, दावरवाडी येथील महिला शेतकरी शारदाबाई भरत मोरे (वय ३५ वर्षे) या बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास दावरवाडी-सोनवाडी रस्त्याने शेतात कापूस वेचण्यासाठी जात होत्या. बुधवारी गावात आठवडी बाजार असल्याने या मार्गावर वर्दळ कमी होती. ही संधी साधून या रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात लपून बसलेले अंदाजे ३० वर्षे वयातील २ चोरटे अचानक शारदाबाई मोरे यांच्या समोर आले. त्यांनी शारदाबाई यांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावरील सोन्याचे दागिने काढून देण्याची मागणी केली. त्यामुळे भीतीने शारदाबाई यांनी गळ्यातील सोन्याची पोत, कानातील कुडके व डाव्या कानातील कर्णफुल काढून दिले. यावेळी या मार्गावर वाटसरू येत असल्याची चाहूल लागताच त्यातील एकाने शारदाबाई यांच्या उजव्या कानातील कर्णफुले जोराने ओरबाडून घेत दावरवाडीकडे पोबारा केला. त्यामुळे त्यांच्या उजव्या कानाचा खालचा भाग तुटल्याने त्या जखमी झाल्या.
कुटुंबीय येईपर्यंत चोरटे पसार
शारदाबाई मोरे यांनी या घटनेची माहिती फोनवरुन कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबातील सदस्य व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. शारदाबाई यांच्यावर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित, उपनिरीक्षक राम बारहाते, पोलिस पाटील एकनाथ काशिद यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक राम बारहाते करीत आहेत.