छत्रपती संभाजीनगरात जिथे ग्राहकांचे होते तक्रार निवारण; तिथेच कर्मचाऱ्यांचे मद्यप्राशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:36 IST2025-03-12T13:31:25+5:302025-03-12T13:36:36+5:30
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयातील तीन सदस्य जिथे सुनावणी घेतात, तेथेच पार्टी रंगल्याचे एका बांधकाम व्यावसायिकाने चित्रित केलेल्या व्हिडीओत दिसते आहे.

छत्रपती संभाजीनगरात जिथे ग्राहकांचे होते तक्रार निवारण; तिथेच कर्मचाऱ्यांचे मद्यप्राशन
छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयात तेथील कर्मचारीच ओली पार्टी करतानाचा सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयातील एका कक्षात मद्यासह इतर पदार्थांची रेलचेल असलेली ओली पार्टी सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयाला हा सगळा प्रकार लेखी पत्राद्वारे कळविला. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयातील तीन सदस्य जिथे सुनावणी घेतात, तेथेच पार्टी रंगल्याचे एका बांधकाम व्यावसायिकाने चित्रित केलेल्या व्हिडीओत दिसते आहे. तो व्हिडीओ कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट नाही.
आयोगाच्या कार्यालयात ग्राहकांशी संबंधित दावे दाखल करून घेत त्यावर सुनावणी घेतली जाते. मात्र, या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी त्या कक्षात ओली पार्टी केल्याने या कार्यालयात नेमके चालते काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम व्यावसायिक सतीश राणे यांनी चित्रित केलेल्या व्हिडीओमधून हा प्रकार समोर आला.
आयोगाला जिल्हा प्रशासनाचे पत्र
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कार्यालय आहे. तेथे न्यायालयीन कामकाज चालते. त्याचे नियंत्रण मुंबई आयोगाकडे आहे. आयोगाच्या अध्यक्षांना घडलेल्या प्रकरणाबाबत पत्र दिले आहे. त्यांना तातडीने कळविले असून, यावर तेच निर्णय घेतील.
- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी