श्रेयासाठी उरकले शिवाजीनगर भुयारी मार्गाचे लोकार्पण; पाणी साचल्याने यंत्रणेचे धिंडवडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 17:44 IST2025-05-20T17:42:05+5:302025-05-20T17:44:23+5:30
शिवाजीनगर भुयारी मार्गात पाणी का साचले? अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट

श्रेयासाठी उरकले शिवाजीनगर भुयारी मार्गाचे लोकार्पण; पाणी साचल्याने यंत्रणेचे धिंडवडे
छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही विकास कामांचे लोकार्पण करण्यापूर्वी संबंधित कार्यालयांची एनओसी घ्यावी लागते. कोणत्याही विभागाची एनओसी न घेता लोकप्रतिनिधींनी परस्पर शिवाजीनगर भुयारी मार्गाचे लोकार्पण करून टाकले. त्यातून भुयारी मार्गाची अनेक कामे बाकी राहिली व पहिल्याच पावसात नागरिकांना त्रासाला समोर जावे लागले.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अलीकडेच शिवाजीनगर भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. पहिल्याच अवकाळी पावसात रविवारी भुयारी मार्गाचे रूपांतर स्वीमिंग पुलात झाले. त्यामुळे तब्बल २५ तास भुयारी मार्गातून वाहतूक ठप्प झाली होती. शिवाजीनगरसह सातारा-देवळाई भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना याचा फटका बसला. भुयारी मार्गात पाणी का थांबले, याचा शोध सोमवारी घेतला असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. सार्वजनिक बांधकाम, रेल्वे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरणच्या बेजबाबदार कारभाराची लक्तरे वेशिला टांगली गेली.
मुंबईत अवघ्या पंधरा ते वीस दिवसांत भुयारी मार्ग पूर्ण होतात. शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी हजारो नागरिकांना दोन वर्षे कळ सोसावी लागली. एवढा त्रास सहन करूनही आता भुयारी मार्गातून सुरळीत वाहतूक होऊ शकणार नाही. कारण, उभारणीतील तांत्रिक अडचणींचा डोंगर थक्क करणारा आहे. पावसाचे पाणी भुयारी मार्गात आले तर वाहून जाण्यासाठी ड्रेन व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. दोन वर्षे तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी नेमके काय काम केले? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. २५ कोटी रुपये कुठे खर्च केले? हे काम सुरू असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी भेट का दिली नाही? कोणत्याही राजकीय मंडळींचा धाक नसल्याने निकृष्ट, तांत्रिकदृष्ट्या चुकीचे व थातूरमातूर काम केले. त्याचे परिणाम आता नागरिकांना भोगावे लागत आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेली मजेशीर उत्तरे
प्रश्न - भुयारी मार्गात पाणी का साचले?
सा. बां. - पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज लाईन टाकता आली नाही. ज्या ठिकाणी लाईन टाकायची तेथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (मजीप्रा) जलवाहिनी आहे.
प्रश्न - जलवाहिनी का शिफ्ट केली नाही?
मजीप्रा - बाजूलाच महावितरणची ३३ केव्हीची केबल आहे. केबल तुटली तर वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.
प्रश्न - विजेची केबल शिफ्ट का केली नाही?
महावितरण - मजीप्राला ६ पत्र दिले. लाईन शिफ्ट करण्यासाठी ९ लाख रुपये पैसे भरावेत, असे सांगितले. त्यांनी पैसेच भरले नाहीत.
डॉ. भागवत कराड यांचा आता पुढाकार
शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कोंडीबाबत डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. भुयारी मार्गाची दुपारी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. कराड म्हणाले, सर्व कार्यालयांचा समन्वय दिवसभरात घडवून आणला. मजीप्राने पैसे भरले. ५ जूनपर्यंत रेल्वे त्यांच्या ड्रेनेजचे काम पूर्ण करेल. स्ट्रॉम वॉटरचे काम पुढील चार आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.