युती होण्यापूर्वीच शिवसेनेचे संपर्क अभियान तर भाजपाची संवाद यात्रा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:50 PM2019-09-19T12:50:39+5:302019-09-19T12:54:23+5:30

पुर्व मतदारसंघात राज्यमंत्री, नगरसेवकांत शब्दांची रणधुमाळी

shiv sena's sanpark abhiyan and bjp's sanwad yatra starts before alliance takes place in Aurangabad | युती होण्यापूर्वीच शिवसेनेचे संपर्क अभियान तर भाजपाची संवाद यात्रा सुरु

युती होण्यापूर्वीच शिवसेनेचे संपर्क अभियान तर भाजपाची संवाद यात्रा सुरु

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद पश्चिम मतदारसंघात स्पर्धा

- विकास राऊत

औरंगाबाद: पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे संपर्क अभियान तर भाजपाने संवादयात्रा सुरू केली आहे. शिवसेना-भाजपा युतीचा निर्णय होण्यापूर्वीच इच्छुकांनी कंबर कसली आहे. तर पूर्व मतदारसंघातही युती होण्यावरून राज्यमंत्री अतुल सावे आणि शिवसेना नगरसेवक राजू वैद्य यांच्यात एका कार्यक्रमाप्रसंगी शब्दांची रणधुमाळी झाली.

भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नगरसेवक राजू शिंदे यांनी मतदारांशी संपर्क करीत शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यास सुरूवात केली आहे. भाजपाचे दुसरे इच्छुक बाळासाहेब गायकवाड यांनी मंगळवारपासून संवाद यात्रेतून विविध घटकातील मतदारांना स्वपरिचय व पक्ष धोरण सांगण्यास सुरूवात केली आहे.  शिवसेनेचे इच्छुक नगरसेवक मनोज गांगवे यांनी बुधवारी पद्मपुरा परिसरातील आप्तेष्टांच्या भेटीगाठी घेत मतदारांचा कल जाणून घेतला. भाजपाचे चंद्रकांत हिवराळे यांनी कार्यालय थाटले आहे. हा सगळा राजकीय गदारोळ पाहता, पश्चिममधील राजकारण युती होण्यापूर्वी ढवळून निघाले आहे. तर त्याचे लोण हळू-हळू पूर्व मतदारसंघातही पसरू लागले आहे. या सगळ्या प्रकारामुळे विद्यमान आमदारांची मात्र गाळण उडू लागली आहे.

भाजपाचे इच्छुक संवाद यात्रेतून मतदार संघातील विविध स्तरातील मतदारांच्या भेटी घेत स्वत:चा परिचय देत आहेत. यात्रेतून सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह पक्षाने राबविलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती ते देत आहेत. डॉक्टर, वकील, व्यापारी, कामगारांच्या भेटी भाजपाचे इच्छुक घेत आहेत. शिवसेनेकडून इच्छुक असलेले गांगवे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी समाजबांधवांनी १० हजारांहून अधिक मतदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र पक्षप्रमुखांना पाठविण्याचा निर्धार केला. तर भाजपातील इच्छुकांमध्ये मतदारांच्या संपर्काची जोरदार स्पर्धा लागली आहे.

पुर्वमध्ये युतीवरून कलगीतुरा
राज्यमंत्री अतुल सावे विद्यानगरचे नगरसेवक राजू वैद्य हे विशालनगरमधील रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी एकाच व्यासपीठावर होते. या कार्यक्रमाप्रसंगी वॉर्डातील ज्येष्ठ नागरिक म्हणाले, युती झाली तर आम्ही राज्यमंत्री सावे यांच्यासोबत राहू, नाहीतर पाहू...ते नागरिक असे म्हणताच सावे व त्यांच्या समर्थकांनी युती झाली आहे, असे जाहीर करून टाकले. दरम्यान नगरसेवक वैद्य यांनी सावे व त्यांच्या समर्थकांना उत्तर देतांना सांगितले, युतीचा निर्णच वरिष्ठ पातळीवर होणार आहे. जो निर्णय होईल, त्यानुसार आमची भूमिका असेल. राज्यमंत्र्यांनी युती जाहीर करून टाकली तर शिवसेनेने वरिष्ठांकडे बोट दाखविल्यामुळे कार्यक्रमस्थळी शब्दांच्या रणधुमाळीची जोरदार चर्चा होती.

Web Title: shiv sena's sanpark abhiyan and bjp's sanwad yatra starts before alliance takes place in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.