भाजपच्या मंत्रीपदाने शिवसेनेत चिंता; लोकसभेसह सर्व विधानसभा मतदारसंघ बांधणीवर मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 12:47 IST2021-07-21T12:39:38+5:302021-07-21T12:47:54+5:30
स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पूर्ण जिल्ह्यांत कार्यकर्ते संपर्क अभियान सुरू केले आहे.

भाजपच्या मंत्रीपदाने शिवसेनेत चिंता; लोकसभेसह सर्व विधानसभा मतदारसंघ बांधणीवर मंथन
- विकास राऊत
औरंगाबाद : शिवसेचा अभेद्य गड राहिलेले औरंगाबाद आता भाजपचे सत्ताकेंद्र झाले आहे. केंद्रातील दोन राज्यमंत्री औरंगाबाद आणि जालना - औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघातून असल्यामुळे या जिल्ह्याचे राजकीय महत्त्व भाजपने वाढविले आहे. परिणामी शिवसेनेत आता मंथन सुरू झाले असून, लोकसभेसह सर्व विधानसभा मतदारसंघ बांधणीसाठी शिवसेना नेते परिश्रम घेत आहेत. एकंदरीत भाजप जिल्ह्यासाठी व्यूहरचना आखत असल्यामुळे शिवसेनेने याबाबत मंथन सुरू केले आहे.
२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा युतीमध्ये लढल्या गेल्या. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला विधानसभेचे औरंगाबाद मध्य, पश्चिम, पैठण, वैजापूर, कन्नड, सिल्लोड हे मतदारसंघ राखता आले, तर भाजपला पूर्व, फुलंब्री आणि गंगापूरच्या जागा मिळाल्या. विधानसभेपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हात दिल्यामुळे शिवसेनेचा पराभव झाल्याचा आरोप सेनेने वारंवार केला.
शिवसेना-भाजपची जिल्ह्यातील सर्व निवडणुकांत १९८८ पासून असलेली युती २०१४ ला विधानसभा निवडणुकीत तुटली. निवडणुकीनंतर पुन्हा युती झाली. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युती झाली. परंतु, त्यानंतर राज्यातील सत्तास्थापनेची समीकरणे बदलली. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करीत सत्ता मिळविली. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुका भाजप स्वतंत्र लढण्याच्या हेतूने मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद जिल्ह्याला सत्तेच्या अग्रस्थानी आणल्याचे बोलले जात आहे.
भाजप लोकसभा निवडणूक लढणार काय?
केंद्रीय मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रिपदी स्थान मिळाले, तर रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्रिपद मिळाले. यामुळे भाजप संघटनेस निश्चित बळ मिळणारच आहे. त्यामुळे शिवसेनेतील लोकसभा लढू इच्छिणाऱ्यांनी भाजपमधील आपल्या मित्रांना भाजपची पुढची रणनीती काय असेल. स्वतंत्र लढण्याबाबत भाजप तयारी करीत आहे काय? याचा कानोसा घेणे सुरू केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला. जिल्ह्यात युतीविना विजय शक्य नसल्यामुळे भाजप कोणाला उमेदवार म्हणून तयार करीत आहे, यावर सेना इच्छुक बारकाईने लक्ष ठेवून आहे.
शिवसेनेचे जिल्हाभर संपर्क अभियान
स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पूर्ण जिल्ह्यांत कार्यकर्ते संपर्क अभियान सुरू केले आहे. पुढच्या वर्षी जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका होण्याचे निश्चित झाल्यास भाजपसह महाविकास आघाडीसोबत सूत जुळणार नाही हे गृहीत धरून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.