भाजपला ठाकरे गटाचा दणका; आमदार प्रशांत बंब यांच्यासह संपूर्ण पॅनल पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 01:23 PM2023-02-14T13:23:11+5:302023-02-14T13:55:24+5:30

गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर गटाचा एकतर्फी विजय

Shiv Sena Thackeray group's blow to BJP; The entire panel including MLA Prashant Bumb lost | भाजपला ठाकरे गटाचा दणका; आमदार प्रशांत बंब यांच्यासह संपूर्ण पॅनल पराभूत

भाजपला ठाकरे गटाचा दणका; आमदार प्रशांत बंब यांच्यासह संपूर्ण पॅनल पराभूत

googlenewsNext

गंगापूर (औरंगाबाद) : तालुक्याचे वैभव असलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचे आमदार व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत बंब यांना सभासदांनी नाकारत सत्तांतराचा कौल दिला. शिवसेना ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या गटाने निवडणूक झालेल्या सर्व २० जागांवर दणदणीत विजय मिळविला. आमदार प्रशांत बंब यांचादेखील पराभव झाला आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून बंद असलेल्या गंगापूर कारखाना निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. भाजपचे आमदार तथा कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सभासद कामगार पॅनल व कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवसेनेचे (ठाकरे गट) कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील शिवशाही शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ लढत झाली. यात आमदार बंब यांच्या पॅनलला खातेही उघडता आले नाही. सभासदांनी बंब यांच्या पॅनलचा सुपडा साफ करीत कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या पॅनलवर विश्वास दाखवला. नोव्हेंबर २०२० मध्ये कारखाना अध्यक्ष आ. बंब यांच्यासह विद्यमान संचालक मंडळावर भ्रष्टाचाराच्या आरोपातून गुन्हे दाखल झाल्याने मध्यंतरी कारखाना राज्यभर गाजला होता. यामुळे या कारखाना निवडणुकीकडे तालुक्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. एकूण १४ हजार ६६ सभासदांपैकी ७ हजार ५९८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पैकी डोणगावकर यांच्या पॅनलने सर्व जागांवर ९०० पेक्षा अधिक मताच्या फरकाने विजय मिळवला. कारखान्याचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब गावंडे व पॅनल प्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांनी अनुक्रमे ४ हजार २१० व ४ हजार २०५ अशी सर्वाधिक मत मिळवली. पराभूत पॅनलचे प्रमुख आमदार प्रशांत बंब यांचा ऊस उत्पादक मतदारसंघ लासूर गटातून ९५५ मतांनी पराभव झाला.

विजयी संचालक पुढीलप्रमाणे
कृष्णा पाटील, सुरेश मनाळ, प्रवीण वालतुरे, कचरू शिंदे, तुकाराम कुंजर, शेषराव पाटेकर, दिलीप बनकर, माया दारुंटे, शोभाबाई भोसले, काशीनाथ गजहंस, बाबूलाल शेख, मधुकर साळुंखे, शेषराव साळुंखे, कारभारी गायके, दादासाहेब जगताप, अप्पासाहेब गावंडे, मनोहर दुबिले, प्रल्हाद निरपळ, नामदेव दारुंटे, देवचंद राजपूत.

कारखाना चालू झाल्यानंतरच सत्कार स्वीकारणार
ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. तरीदेखील शेतकरी कोणत्याही आमिषाला बळी न पडता कारखाना सुरू करण्यासाठी आमच्या पाठीशी राहिले. त्यामुळे हा विजय सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असून, ही तालुक्यातील परिवर्तनाची नांदी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना सुरू करण्यासाठी आमच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ देणार नाही. जोपर्यंत कारखाना सुरू करणार नाही तोपर्यंत विजयी सत्कारदेखील स्वीकारणार नाही.
- कृष्णा पाटील डोणगावकर, विजयी पॅनलचे प्रमुख

Web Title: Shiv Sena Thackeray group's blow to BJP; The entire panel including MLA Prashant Bumb lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.