यंदाही आग्रातील ऐतिहासिक किल्ल्यात होणार शिवजयंती; फडणवीस, शिंदेंसह विकी कौशल येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:03 IST2025-02-17T15:02:40+5:302025-02-17T15:03:46+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अभिनेता विकी कौशलची प्रमुख उपस्थिती

यंदाही आग्रातील ऐतिहासिक किल्ल्यात होणार शिवजयंती; फडणवीस, शिंदेंसह विकी कौशल येणार
छत्रपती संभाजीनगर :छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सलग तिसऱ्या वर्षी यंदा बुधवारी आग्रा येथील किल्ल्यात साजरी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे किल्ल्यातील जहाँगीर महाल या ऐतिहासिक स्थळी यंदा शिवजयंतीचा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
किल्ल्यात सायंकाळी ६ वाजता आयोजित मुख्य सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नुकताच प्रदर्शित झालेला ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास त्यांची महती सर्व देशभरातील नवपिढीपर्यंत पसरविण्यासाठी शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यंदा आग्रा किल्ला व छत्रपती शिवाजी महाराजांचा काय संबंध ? या विषयावर नाटक सादर करण्यात येणार आहे. अफझल खान वध या प्रसंगाचे नाट्यरूपांतर, तसेच शौर्यगीत गायक नितीन सरकटे व उत्कर्ष शिंदे सादर करतील. शिव जन्माचा पाळणा आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा महाराष्ट्र गीतांचा कार्यक्रम व पारंपरिक मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित दीपोत्सव, डिजिटल आतषबाजी व राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता होईल.
‘त्या’ जागी जागतिक स्मारक उभारण्याचा मानस
आग्रा येथे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवले होते. त्या जागी सध्या आश्रम आहे. या ऐतिहासिक स्थळाची जागा विकत किंवा लीजवर घेता येईल का, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ती जागा मिळाली तर अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक स्मारक उभारण्याचा मानस अध्यक्ष विनोद पाटील यांनी व्यक्त केला.