उपकुलसचिवांना शिवीगाळ करणाऱ्या शंकर अंभोरेंचा पोलिसांना संपर्क होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 20:41 IST2020-01-09T20:39:37+5:302020-01-09T20:41:47+5:30
आरोपींच्या शोधासाठी पथक पाठविणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय बहुरे यांनी सांगितले.

उपकुलसचिवांना शिवीगाळ करणाऱ्या शंकर अंभोरेंचा पोलिसांना संपर्क होईना
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांना शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे, डॉ. राहुल तायडे यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल झाले. यानंतर बुधवारी सकाळी अटक करण्यासाठी पोलीस दोघांच्या घरी पोहोचले असता, सापडले नाहीत. या आरोपींच्या शोधासाठी पथक पाठविणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय बहुरे यांनी सांगितले.
विद्यापीठातील पीएच.डी. विभागात चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शक देणे, शोधप्रबंध सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोधप्रबंध जवळच्या व्यक्तीकडेच मूल्यांकनासाठी पाठविणे, असे गैरप्रकार सुरू आहेत. याला आळा घालण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे अनेकांची दररोजची वर्दळ कमी झाली आहे. याचवेळी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे आणि डॉ. राहुल तायडे यांनी मंगळवारी सायंकाळी उपकुलसचिव डॉ. नेटके यांच्या दालनात जात व्यवस्थापनशास्त्र विषयात पीएच.डी. करीत असलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांचा शोधप्रबंध स्वत:चा विषय असलेल्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांकडे पाठविण्याचा आग्रह धरला. मात्र, डॉ. नेटके यांनी त्याला नकार दिला.
यामुळे संतापलेल्या डॉ. अंभोरे यांनी शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आरोपींचा घरी जाऊन शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. यानंतर तपास अधिकाऱ्यांनी विद्यापीठात येत घटनास्थळाचा पंचनामा करून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याचेही संजय बहुरे यांनी सांगितले, तसेच आरोपींना येत्या दोन दिवसांत अटक केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.