‘शक्तिपीठ’ मराठवाड्याच्या सहा जिल्ह्यातून जाणार; ‘समृद्धी’नंतर पुन्हा महत्त्वाची कनेक्टिव्हिटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:15 IST2025-06-25T18:14:24+5:302025-06-25T18:15:07+5:30

१२ जिल्ह्यांतून जाणाऱ्या मार्गात मराठवाड्याचे सहा जिल्हे

'Shaktipith Mahamarga' will pass through six districts of Marathwada; After 'Samruddhi Mahamarga', important connectivity again | ‘शक्तिपीठ’ मराठवाड्याच्या सहा जिल्ह्यातून जाणार; ‘समृद्धी’नंतर पुन्हा महत्त्वाची कनेक्टिव्हिटी

‘शक्तिपीठ’ मराठवाड्याच्या सहा जिल्ह्यातून जाणार; ‘समृद्धी’नंतर पुन्हा महत्त्वाची कनेक्टिव्हिटी

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गानंतर आता मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांना महत्त्वाची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. शक्तिपीठ या नवीन महामार्गाला राज्य शासनाने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. १२ जिल्ह्यांतून हा मार्ग प्रस्तावित असून, त्यात मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.

वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग परळीतील वैजनाथ, औंढा नागनाथ, माहूरची रेणुकादेवी, आई तुळजा भवानी, पंढरपूरमधील विठ्ठल-रुखुमाई मंदिर, कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर, सोलापूरमधील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा, नृसिंहवाडी आणि औदुंबर अशा तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा मार्ग आहे.

समृद्धी महामार्गाने मराठवाड्याला विकासाची गती दिल्यानंतर आता धार्मिक कनेक्टिव्हिटीचाही नवा मार्ग खुला होण्याची चिन्हे आहेत. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ कॉरिडॉर योजनेत मराठवाड्याच्या सहा जिल्ह्यांतून मार्ग जाण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे भाविकांसाठी हा प्रवास अधिक सोपा आणि जलद होईलच; शिवाय औद्योगिक, पर्यटन, शेतमाल व इतर वाहतुकीचे मोठे दळणवळणाचे ‘मॅग्नेट’ भविष्यात निर्माण होईल. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चार विभागांचे एकत्रीकरण या मार्गामुळे होईल. वर्धा ते सिंधुदुर्ग असा सुमारे ७५० ते ८०० किमीचा महामार्ग आहे.

समृद्धीवर ६४ हजार कोटींचा खर्च
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर ६४ हजार कोटींचा खर्च शासनाने केला आहे. या मार्गाचा पहिला टप्पा सहा वर्षांत सुरू झाला. मार्गाचे पूर्ण काम होण्यास ९ वर्षे लागली. भूसंपादनासाठी मोठा खर्च झाला आहे. शक्तिपीठ महामार्गासाठीदेखील भूसंपादनासाठी मोठा खर्च लागणे शक्य आहे. भूसंपादन कसे करणार, हे आगामी काळात समोर येईल.

Web Title: 'Shaktipith Mahamarga' will pass through six districts of Marathwada; After 'Samruddhi Mahamarga', important connectivity again