मराठवाड्यात शक्तिपीठ महामार्ग संयुक्त मोजणीचा नारळ फुटला, लातूर जिल्ह्यातून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 20:25 IST2025-10-11T20:24:38+5:302025-10-11T20:25:05+5:30
मराठवाड्यात नांदेड ३७ कि.मी., हिंगोली ४३.१७, परभणी ६६, बीड ३८, लातूर ४३, धाराशिव ४५ कि.मी. भूसंपादन करावे लागणार आहे.

मराठवाड्यात शक्तिपीठ महामार्ग संयुक्त मोजणीचा नारळ फुटला, लातूर जिल्ह्यातून सुरुवात
छत्रपती संभाजीनगर : नागपूर ते गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग उभारणीसाठी मराठवाड्यात संयुक्त मोजणीचा नारळ लातूरमधून शुक्रवारी फुटला. लातूर येथील शेतकऱ्यांनी संयुक्त मोजणीच्या प्रक्रियेत सहभाग दर्शविल्याने भूसंपादन प्रक्रियेला आगामी काळात वेग येईल. त्या जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्गाची ४३.१७ किमी लांबी असेल. लातूर, रेणापूर, औसा या तालुक्यांतील २२ गावांमधून हा मार्ग जात आहे.
लातूर तालुक्यातील १३ गावांत २६ किमी लांबीचा भाग जाणार आहे. यासाठी २७५ हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. या महामार्गाचे फायदे शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, अविनाश कोरडे यांनी सांगितले. गातेगाव येथील शेतकरी व्यंकटेश ढोणे, चिंचोली येथील शेतकरी अजय बनसोडे आदी शेतकरी मोजणी दरम्यान उपस्थित होते. राज्यातील १२ जिल्ह्यांच्या ३९ तालुक्यांतील ३७१ गावांतून शक्तिपीठ मार्ग जाणार आहे. १२ हजार ६०७ गटांतील ८ हजार ६१५ हेक्टर भूसंपादन या मार्गासाठी करावे लागणार असून, सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यातील जमीन या मार्गासाठी जाणार आहे. पाच प्रशासकीय विभागांतून जाणारा हा मार्ग १८ देवस्थानांना जोडणार आहे. भूसंपादन प्रक्रियेला काही जिल्ह्यांत सुरुवात झाली आहे. ३६ किमी वनक्षेत्रातून हा मार्ग प्रस्तावित आहे. २६ इंटरचेंजेस या मार्गावर असणार आहेत. मराठवाड्यात नांदेड ३७ कि.मी., हिंगोली ४३.१७, परभणी ६६, बीड ३८, लातूर ४३, धाराशिव ४५ कि.मी. भूसंपादन करावे लागणार आहे.
८६ हजार कोटींचा खर्च
या प्रकल्पाला भूसंपादनाच्या ११ हजार ७३२ कोटींसह ८६ हजार ३५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग सहा पदरी असणार आहे. मार्गावर ११ रेल्वे ब्रिज व २६४ पूल बांधण्यात येणार आहेत. २१ बोगदे प्रस्तावित असून, ५ किमी लांबीचा बोगदा या मार्गावर बांधण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील भूसंपादन किती?
जिल्हा...........तालुका.........गावे.......गटसंख्या..........भूसंपादन हेक्टरमध्ये
नांदेड.......२...................२२...............४४१......३८७.२६ हेक्टर
हिंगोली....२................२४.................४३६.........४३०.५२ हेक्टर
परभणी......३...............३१.................७०८.......७४२.८० हेक्टर
बीड...........२............१४.................५१८..........४११.७७ हेक्टर
लातूर........३...........२२...................५१२.........४१४.९४ हेक्टर
धाराशिव.......२..............१९............६५५...............४६१.०६ हेक्टर