'शक्कर को टक्कर...'; अक्षय तृतीयेसाठी ३०० टन आंब्यांची बाजारात बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2023 12:39 PM2023-04-22T12:39:38+5:302023-04-22T12:41:33+5:30

एक मोठा ग्राहक वर्ग असा आहे की, ते अक्षय तृतीयेच्या दिवशी देवाला आंब्याचे नैवेद्य दाखवून आमरस खाणे सुरू करतात.

'Shakkar Ko Takkar...'; 300 tons of mangoes bloom in the market for Akshaya Tritiya | 'शक्कर को टक्कर...'; अक्षय तृतीयेसाठी ३०० टन आंब्यांची बाजारात बहर

'शक्कर को टक्कर...'; अक्षय तृतीयेसाठी ३०० टन आंब्यांची बाजारात बहर

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : ‘शक्कर को टक्कर आज कम भाव, कल की गॅरंटी नही’ असा ओरडत शहागंजात शुक्रवारी विक्रेते आंबा विकत होते. अक्षय तृतीयेनिमित्त मागील दोन दिवसात तब्बल ३०० टन आंबा विक्रीला आला आहे. उद्या भाव वाढतील म्हणून आदल्या दिवशी ग्राहकांनी आंबे खरेदीला गर्दी केली होती.

शहरात अनेक ग्राहक असे आहेत की, त्यांनी हापूसची पहिली पेटी फेब्रुवारी बाजारात आल्यापासून मिळेल त्या भावात आंबा खरेदी करणे सुरू केले. मात्र, एक मोठा ग्राहक वर्ग असा आहे की, ते अक्षय तृतीयेच्या दिवशी देवाला आंब्याचे नैवेद्य दाखवून आमरस खाणे सुरू करतात. यामुळे आंबे विक्रेत्यांचे लक्ष अक्षय तृतीयेवर असते. जाधववाडीतील कृउबा समितीमध्ये व शहरात मागील दोन दिवसात ३०० टन पेक्षा जास्त आंबे विक्रीला आले आहेत. शुक्रवारी आंबा खरेदीसाठी सर्वत्र गर्दी दिसत होती. कोणी एक किलो तर कोणी पाच किलो आंबे खरेदी करीत होते. शनिवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी घरोघरी ‘रसाळी’चा बेत रंगणार आहे. तसेच अक्षय तृतीयेसोबतच रमजान ईदही सर्वत्र साजरी केली जात आहे. यामुळे ३०० टन आंबे कमी पडतील की, काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

परराज्यातून आले आंबे
गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून शहरात आंबे विक्रीला आणण्यात आले आहेत. यात लालबाग ८० ते १०० रुपये, केशर आंबा २०० रुपये, बदाम ७० ते ८० रुपये तर दसेरी १५० ते २० रुपये किलोने विकल्या जात असल्याची माहिती आंबा विक्रेता जुनेद खान यांनी दिली.

लाखभर करा, केळी बाजारात
अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांना तृप्त करण्यासाठी दोन मातीच्या कलशाची पूजा केली जाते. त्यात ज्यांचे वडील हयातीत नाही आणि आई जिवंत आहे अशा कुटुंबाने ‘करा’(कळसा) म्हणजे मातीचे मोठे गोलकार भांडे खरेदी करावे, तर ज्यांचे वडील आहेत; पण आई हयातीत नाही त्यांनी छोट्या आकारातील ‘केळी’ गोलाकार मातीचे भांडे खरेदी करावे. केळी व करा यांचे पूजन करून आंबे, गहू, खरबूज हे दान केले जाते. यासाठी सूर्योदयापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त असल्याने वेदमूर्ती सुरेश केदारे गुरुजी यांनी सांगितले. यानिमित्त बाजारात आज मुख्य चौकात जागोजागी लाल मातीचे भांडे करा व केळीच्या राशी दिसून आल्या. विक्रेते मोठ्या आकारातील ‘करा’ ५० रुपयांना तर लहान आकारातील ‘केळी’ भांडे २० रुपयांना विकताना दिसून आले. एक लाख करा, केळी बाजारात दाखल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Web Title: 'Shakkar Ko Takkar...'; 300 tons of mangoes bloom in the market for Akshaya Tritiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.