शेक्सपिअर मराठी माणसांच्या रक्तात भिनला
By Admin | Updated: April 28, 2016 23:49 IST2016-04-28T23:25:53+5:302016-04-28T23:49:49+5:30
औरंगाबाद : जगप्रसिद्ध नाटककार व कवी विल्यम शेक्सपिअरची सुमारे ७२ ते ७४ नाटके मराठीत भाषांतरित झाली आहेत.

शेक्सपिअर मराठी माणसांच्या रक्तात भिनला
औरंगाबाद : जगप्रसिद्ध नाटककार व कवी विल्यम शेक्सपिअरची सुमारे ७२ ते ७४ नाटके मराठीत भाषांतरित झाली आहेत. मराठीतील लेखक, कवी, दिग्दर्शक, रंगकर्मी, रसिकच नव्हे तर येथील राजकारण्यांच्या रक्तात एवढा शेक्सपिअर भिनला आहे की, तो आता आपलासा वाटू लागला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांनी शेक्सपिअरचा मराठी मनावर झालेल्या प्रभावाचे वर्णन केले.
प्रसंग होता, परिवर्तन व सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेक्सपिअर महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचा. गुरुवारी सायंकाळी गोविंदभाई श्रॉफ कला अकादमी सभागृहात महोत्सवाचे उद्घाटन विजय केंकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते ‘ शेक्सपिअर आणि मराठी नाटक’ या विषयावर बोलत होते. व्यासपीठावर स. भु. शिक्षण संस्थेचे श्रीरंग देशपांडे, परिवर्तनचे भालचंद्र कांगो, रवी खिंवसरा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ‘शेक्सपिअर आणि मराठी नाटक’ या विषयावर पीएच. डी. करणाऱ्या लता मोहरीर यांचा सत्कार करण्यात आला. शेक्सपिअरचे मराठीतील भाषांतरित केलेल्या नाटकावरील स्वानुभव केंकरे यांनी सर्वांसमोर मांडले. ते म्हणाले की, शेक्सपिअरबद्दल असंख्य गोष्टी बोलल्या जातात. शेक्सपिअरने अत्यंत सक्षम नाटके लिहिली हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. जेव्हा मी शेक्सपिअरचे ‘ अॅथेल्लो’ हे नाटक करण्याचे ठरविले त्यावेळी सर्वप्रथम मी विविध लेखनाच्या माध्यमातून शेक्सपिअर समजून घेतला. आपल्याला नादी लावणारा नाटककार, असाच मी त्याचा उल्लेख करील. नानासाहेब पेशवे यांनी सर्वप्रथम शेक्सपिअरचे मराठीत ‘ हॅम्लेट’ हे नाटक अनुवादित केले, असा उल्लेखही त्यांनी केला. शेक्सपिअरच्या शैलीचा प्रभाव मराठीतील नाटककार, कवींवर किती झाला याची उदाहरणासह माहिती त्यांनी दिली. शेक्सपिअरचे नाटक करताना त्यावर भाषेच्या सौंदर्याने व व्यक्तिरेखेने रसिकांपर्यंत पोहोचेल हे बघावे, असा सल्लाही केंकरे यांनी दिला. प्रारंभी, प्रास्ताविक नाट्यलेखक अजित दळवी यांनी केले. यानंतर लेखक, दिग्दर्शक प्रवीण पाटेकर यांची ‘ पाझर’ ही एकांकिका सादर करण्यात आली. सूत्रसंचालन नीना निकाळजे यांनी केले.