सेव्हन हिलच्या झोपड्या पुन्हा हटविल्या; मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे ही हटविली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 15:30 IST2023-10-14T15:27:12+5:302023-10-14T15:30:00+5:30
गजानन महाराज मंदिर रोडवरील आठ झोपड्या महापालिकेने हटविल्या.

सेव्हन हिलच्या झोपड्या पुन्हा हटविल्या; मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे ही हटविली जाणार
छत्रपती संभाजीनगर : सेव्हन हिल उड्डाणपूल ते गजानन महाराज मंदिर रोडवरील ८ झोपड्या शुक्रवारी महापालिकेने पुन्हा हटविल्या. जी-२० परिषदेच्या वेळेसही मनपाने कारवाई केली होती. त्यानंतर नागरिकांनी परत अतिक्रमण केले होते. या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणेही हटविली जाणार आहेत.
गजानन महाराज मंदिर रोडवर काही वर्षांपूर्वी गोर-गरीब नागरिक पाटे, वरवंटा, लाकडापासून तयार केलेल्या खेळण्या विकत होते. हळूहळू त्यांनी झोपड्या टाकून तेथेच राहण्यास सुरुवात केली. त्यामुळे पादचाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागतोय. अनेकदा छोटे-मोठे अपघातही घडले. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा अतिक्रमण करणाऱ्यांची समजूत घातली. मनपाचे पथक कारवाईला गेल्यावर संबधित आरडाओरडा करून आत्महत्या करण्याच्या धमक्या देत होते. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी आणि उपायुक्त सविता सोनवणे यांच्यावर अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी सोपविली.
शुक्रवारी सोनवणे यांनी पुन्हा एकदा समजूत काढली परंतु नागरिक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. जवाहरनगर पोलिसांना बोलावले गेले. प्रशासकांनी मोबाइलवर संबधितांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी अतिक्रमण काढण्यास संमती दिली. दिवसभरात मनपाने आठ झोपड्या काढल्या. उर्वरित झोपड्या शनिवारी सकाळी काढण्यात येणार आहेत. यावेळी वॉर्ड अधिकारी जाधव, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे आदी उपस्थित होते.