सर्व्हिसिंग सेंटरचा रोखपाल पावणेचार लाखांच्या अपहारात अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 17:37 IST2018-10-18T17:35:49+5:302018-10-18T17:37:58+5:30
चारचाकी वाहनांच्या सर्व्हिसिंग सेंटरच्या रोखपालानेच ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांची संगणकात नोंद न करता सुमारे ३ लाख ७२ हजार ३९९ रुपयांचा अपहार केला.

सर्व्हिसिंग सेंटरचा रोखपाल पावणेचार लाखांच्या अपहारात अटकेत
औरंगाबाद : चारचाकी वाहनांच्या सर्व्हिसिंग सेंटरच्या रोखपालानेच ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांची संगणकात नोंद न करता सुमारे ३ लाख ७२ हजार ३९९ रुपयांचा अपहार केला. हा प्रकार लक्षात येताच आरोपी रोखपालाविरोधात वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
नीलेश अमर पवार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, अदालत रोडवरील धूत मोटार्सचे व्यवस्थापक धीरज रामनाथ मंत्री यांनी याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात १५ रोजी तक्रार नोंदविली. आरोपी धूत मोटार्समध्ये रोखपाल म्हणून कार्यरत होता. सप्टेंबर २०१७ ते १२ जून २०१८ या कालावधीत आरोपीने सुमारे १०० ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन त्यांना इन्व्हाइस बिल दिले. मात्र त्या बिलाची नोंद तो संगणकात न घेता ग्राहकांकडून घेतलेली रक्कम स्वत:च्या खिशात टाकत असे.
याविषयीची माहिती मंत्री यांना मिळाल्यानंतर त्यांनी लेखापालाकडून वर्षभरातील व्यवहाराचे आॅडिट केले. त्यानंतर त्यांनी आरोपीला अपहार करताना रंगेहात पकडले. त्याच्याकडे या अपहाराविषयी अधिक चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्याच्याविरोधात मंत्री यांनी वेदांतनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.