पाणी पुरवठ्यावर संकटांची मालिका सुरूच; आता चितेगाव येथे नवीन जलवाहिनीवरील वॉलला तडा
By मुजीब देवणीकर | Updated: February 16, 2024 14:33 IST2024-02-16T14:27:23+5:302024-02-16T14:33:30+5:30
चितेगाव येथे नवीन ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील वॉलला तडा; लाखो लीटर पाणी वाया

पाणी पुरवठ्यावर संकटांची मालिका सुरूच; आता चितेगाव येथे नवीन जलवाहिनीवरील वॉलला तडा
छत्रपती संभाजीनगर: शहराची तहान भागवण्यासाठी २०० कोटी रुपये खर्च करून ९०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. मागील दोन दिवसांपासून क्रॉस कनेक्शन आणि जलवाहिनीची टेस्टिंग करण्याचे काम सुरू होते. गुरुवारी टेस्टिंग अयशस्वी झाली. तर आज सकाळी चितेगाव येथे ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील वॉलला तडा गेला. यामुळे लाखो लीटर पाणी वाहून गेले असून शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पाण्याचा ठणठणाट आहे.
शहरावरील पाणीपुरवठ्याचे संकट काही केल्या हटेना. नवीन ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला जुनी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी जोडण्यासाठी बुधवारी केलेले शटडाऊन २४ तास चालले. त्यानंतर गुरुवारी दुपारी पाणीपुरवठा सुरू करताच काही तासांतच सायंकाळी ४.३० वाजता फारोळ्याजवळ ९०० मिलिमीटर व्यासाच्या नव्या जलवाहिनीची जोडणी निखळल्याने पाणीपुरवठा पुन्हा बंद पडला. तर आता आज सकाळी चितेगाव येथे नवीन ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील वॉलला तडा गेल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. या भागातील नागरिकांनी जनावरांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली. सकाळपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे.
चितेगाव येथे नवीन ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील वॉलला तडा; लाखो लीटर पाणी वाया, पाणी पुरवठ्यावरील संकट कायम #chhatrapatisambhajinagarpic.twitter.com/nChnMyCaVe
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) February 16, 2024
शहरासाठी नवी ९०० मि.मी. व्यासाची जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान जलवाहिनी टाकली आहे. याची चाचणी घेण्यासाठी जायकवाडी आणि फारोळा येथे १२०० मि.मी. व्यासाच्या वाहिनीवर क्रॉस कनेक्शन करून ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला जोडणे गरजेचे असल्याने बुधवारी जीवन प्राधिकरणच्या मागणीवरून मनपाने शटडाऊन घेतले. बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत काम संपले नाही. त्यामुळे १२०० मि.मी. व्यासाच्या वाहिनीतून केला जाणारा पाणीपुरवठा सकाळी दहानंतर बंद केला. काम संपल्यानंतर गुरुवारी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी एक पंप सुरू केला. त्यानंतर सकाळी साडेअकरा पूर्ण पंप सुरू केले. सिडकोसाठी असलेली एक्स्प्रेस जलवाहिनी कोरडी केली होती. दुपारनंतर शहरात पाणी येणे अपेक्षित होते. परंतु सायंकाळी ४.३० वाजता नव्या ९०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी फारोळ्याजवळ निखळली.
सिडकोतील जलकुंभ कोरडे
सिडको भागातील जलकुंभ ३६ तास कोरडे होते. गुंठेवारी भागातही टॅंकर जाऊ शकले नाहीत. पुंडलिकनगर परिसरातील हनुमाननगर भागाला नऊ दिवसांपासून पाणीपुरवठा नाही. अशीच परिस्थिती बुधवार, गुरुवारी पाणीपुरवठ्याची वेळ असणाऱ्या वसाहतींमध्ये होती. सिडको-हडकोतील काही भागांत दि. ७ फेब्रुवारीला पाणीपुरवठा केला होता. गुरुवारी आठवा दिवस असतानादेखील उशिरापर्यंत पाणीपुरवठा झाला नव्हता.