ग्राहक सोडून दुसरीकडेच गॅस विक्री; छ. संभाजीनगरमध्ये तीन एजन्सी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:29 IST2026-03-28T14:29:12+5:302026-03-28T14:29:48+5:30
राजकीय राड्यानंतर पोलिसांची धाव अन् रात्री गॅस एजन्सीच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

ग्राहक सोडून दुसरीकडेच गॅस विक्री; छ. संभाजीनगरमध्ये तीन एजन्सी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : एजन्सी सोडून नियमबाह्य अन्य ठिकाणी अवैधरीत्या गॅस सिलिंडर विक्री प्रकरणात शुक्रवारी रात्री अखेर आदित्य भारत गॅस एजन्सीच्या धीरज फुलचंद बारवाल (४४, बल्सीलालनगर, म्हाडा कॉलनी), आनंद छगन अंबिलढगे (३५), उत्तम देवराव कसारे (३७, रा. सावंगी) या तीन कर्मचाऱ्यांवर हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल केला.
शुक्रवारी ऑडिटर सोसायटीतील आदित्य भारत गॅस एजन्सीपासून काही अंतरावर अवैधरीत्या गॅस सिलिंडर विक्री प्रकरणावरून राजकीय कार्यकर्त्यांनी राडा केला. घटनेची माहिती कळताच हर्सूल ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्वाती केदार, उपनिरीक्षक गणेश केदार, सचिन पागोटे यांनी धाव घेतली. अन्न वितरण अधिकारी भारती वाकोडे, पुरवठा निरीक्षक संदीप मोरे हेही घटनास्थळी दाखल झाले. राजकीय कार्यकर्त्यांनी सदर एजन्सी कर्मचारी वाहनातून भारत कंपनीचे एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर विक्री करत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली, तेव्हा त्यांनी एजन्सीसमोर ग्राहकांची गर्दी असल्याने त्यांनी दूर येऊन सिलिंडर विक्री करत असल्याचा दावा केला.
ना नोंद, बुकिंग डिटेल्स
पोलिसांनी त्यांना ग्राहकांची नोंदणी क्रमांक, यादीबाबत विचारणा केली. मात्र, कर्मचारी कुठलीच माहिती सादर करू शकले नाहीत. त्यांच्या ताब्यात ४८ गॅस सिलिंडर आढळले. त्यापैकी ५ भरलेले, तर ४३ सिलिंडर रिकामे आढळले. वितरण अधिकारी वाकोडे यांच्या तक्रारीवरून बारवाल, अंबिलढगे व कसारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कायदा हातात घेऊ नका, निरीक्षकांनी खडसावले
उद्धवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांवर आगपाखड करत धावून जाण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांचे ते वागणे पाहून पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी त्यांना खडसावले. 'पोलिस उपस्थित आहेत, तुम्ही कायदा हातात घेण्याची गरज नाही', असे सुनावल्यानंतर पदाधिकारी शांत झाले.