पळशीतील शेतात गुपचूप गांजाची लागवड; सिल्लोड पोलिसांची मोठी कारवाई, आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 17:33 IST2025-10-16T17:32:42+5:302025-10-16T17:33:22+5:30
रात्रीच्या अंधारात 'गांजा'चा पर्दाफाश; १७ झाडे आणि २ लाख ७९ हजारांचा साठा जप्त

पळशीतील शेतात गुपचूप गांजाची लागवड; सिल्लोड पोलिसांची मोठी कारवाई, आरोपी फरार
सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर): कष्टकरी म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्याने आपल्याच शेतात आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या गांजाची झाडे लावून 'तस्कर' बनण्याचा धक्कादायक प्रकार सिल्लोड तालुक्यातील पळशी शिवारात उघडकीस आला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी रात्री छापा मारून तब्बल २ लाख ७९ हजार २०० रुपये किंमतीचा २९ किलो गांजा जप्त केला आहे.
सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांना पळशी येथील शेतात गांजा लागवड सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी नायब तहसीलदार बोरकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाला सोबत घेऊन बुधवारी रात्री १० वाजता पळशी शिवारातील चतरसिंग जालमसिंग जोनवाल यांच्या शेतात छापा मारला. पोलिसांच्या या धडक कारवाईची माहिती मिळताच आरोपी चतरसिंग जोनवाल हा मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
१७ झाडे आणि २ लाख ७९ हजारांचा साठा जप्त
पोलिसांनी आरोपीच्या शेतात लावलेली १७ गांजाची झाडे जप्त केली. यात ओला आणि सुका गांजा तसेच गांजाची पाने-फुले असा एकूण २७.९२० किलो ग्रॅम वजनाचा, २ लाख ७९ हजार २०० रुपये किमतीचा गांजाचा साठा आहे. ही कारवाई केल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी पहाटे ४ वाजता पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर यांच्या तक्रारीवरून आरोपी चतरसिंग जोनवाल विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
'फायद्यासाठी' शेतकऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन करू नये
पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, आरोपी जोनवालने केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या ही गांजा लागवड केली होती. शेतीत कष्ट करून आपले आयुष्य फुलवण्याऐवजी अशा अमली पदार्थांच्या मार्गाचा अवलंब करणे हे अत्यंत गंभीर आहे. पोलीस पथकाने जप्त केलेल्या गांजाच्या झाडांसोबत नायब तहसीलदार आणि पोलीस अधिकारी फोटोत दिसत आहेत. फरार आरोपीला लवकरच बेड्या ठोकण्यात येतील, अशी माहिती पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी दिली आहे.