औरंगाबादमध्ये भिक्खू संघाचे बेमुदत उपोषण;भिडे, एकबोटे यांना तात्काळ अटक करण्याची केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 14:16 IST2018-01-12T00:02:47+5:302018-01-12T14:16:49+5:30
कोरेगाव-भीमा येथील दंगलीस कारणीभूत असलेले संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी भिक्खू संघाने आज गुरुवारपासून भडकलगेटलगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणाला अनेक सामाजिक व राजकीय पक्ष-संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

औरंगाबादमध्ये भिक्खू संघाचे बेमुदत उपोषण;भिडे, एकबोटे यांना तात्काळ अटक करण्याची केली मागणी
औरंगाबाद : कोरेगाव-भीमा येथील दंगलीस कारणीभूत असलेले संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी भिक्खू संघाने आज गुरुवारपासून भडकलगेट लगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणाला अनेक सामाजिक व राजकीय पक्ष-संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
यासंदर्भात अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रदेशाध्यक्ष भदन्त बोधिपालो महाथेरो यांनी सांगितले की, कोरेगाव-भीमा येथील दंगलीमुळे समाजामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. पुणे येथील पोलीस आयुक्तांच्या निष्काळजीपणामुळे ही दंगल उसळली. या दंगलीस कारणीभूत धरून त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद ज्या ज्या ठिकाणी उमटले व हजारो कार्यकर्त्यांना भादंवि ३०७ कलमान्वये पोेलिसांनी अटक केली, अशा कार्यकर्त्यांची या गुन्ह्यातून तात्काळ मुक्तता करण्यात यावी, शहरात विविध वसाहतींमध्ये पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशनद्वारे अटकसत्र राबविले, या कोम्बिंग आॅपरेशनची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करण्यात यावी व दोषी पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना बडतर्फ करण्यात यावे, पोलिसांनी शहरातील अनेक भागांमध्ये आकसबुद्धीने कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्याखाली अटक केली आहे, याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, या मागण्यांसाठी बौद्ध भिक्खू बेमुदत उपोषणाला बसले आहेत.समाजामध्ये एकता, शांतता, मैत्री निर्माण व्हावी या भूमिकेचे आम्ही आहोत. त्यासाठी शहरातून शांतता रॅली काढली . मात्र शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला, असे भदन्त बोधिपालो महाथेरो म्हणाले.
दहा भिक्खूंचा उपोषणात सहभाग
भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दहा बौद्ध भिक्खूंनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये भन्ते करुणानंद थेरो, भन्ते राहुल थेरो, भन्ते धम्मबोधी थेरो, भन्ते दीपंकर, भन्ते सुदत्तबोधी, भन्ते संघप्रिय, भन्ते करुणासागर, भन्ते धम्मक्षित, भन्ते राहुल आणि भन्ते बुद्धपाल आदींचा समावेश आहे.