बोगस कॉल सेंटरच्या सूत्रधाराचा शोध सायबर तज्ज्ञांकडून सुरूच; व्हॉट्सॲप, टेलिग्रामचा असे वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:40 IST2025-11-11T16:39:48+5:302025-11-11T16:40:01+5:30
आरोपींना जामीन मिळाल्यास तपासावर परिणाम होण्याची भीती: न्यायालयाने ११२ कर्मचारी आरोपींचा जामीन नाकारला

बोगस कॉल सेंटरच्या सूत्रधाराचा शोध सायबर तज्ज्ञांकडून सुरूच; व्हॉट्सॲप, टेलिग्रामचा असे वापर
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाण्यात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचे देशभरातील सर्व सूत्रधार एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमीच व्हॉट्सॲप, टेलिग्रामसह अन्य ॲप वापरत होते. त्यांच्यामध्ये सामान्य कॉल होत नसल्याने तपास पथक आता सायबर तज्ज्ञांच्या मदतीने सूत्रधारांचा माग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अटकेतील ११२ कर्मचाऱ्यांनी जामीनासाठी धडपड सुरू केली आहे. मात्र, सोमवारी न्यायालयाने या सर्व ११२ कर्मचाऱ्यांचा जामीन नाकारल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
विदेशी नागरिकांना गिफ्ट कार्डच्या जाळ्यात ओढून कार्डची माहिती प्राप्त होताच त्यातील पैसे लुटण्यासाठी देशभरातील विविध कॉल सेंटरमधून लूटमार चालत असल्याची धक्कादायक बाब दोन आठवड्यांपूर्वी उघडकीस आली. यात या नागरिकांना पॉप अप मेसेज पाठवून कॉल प्राप्त झाला, तर जाळ्यात ओढण्याची जबाबदारी शहरातील बोगस कॉल सेंटरमधून चालत होती. गुजरातच्या टोळीने आठ महिन्यांपूर्वी शहरात आयटी कंपनीच्या नावाने हे कॉल सेंटर उभारले होते. २९ ऑक्टोबर रोजी चिकलठाण्यातील आयटी पार्कमध्ये कंपनीच्या नावाखाली थाटण्यात आलेल्या कॉल सेंटरवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी धाड टाकली. यात कॉल सेंटरचा मुख्य मास्टरमाइंड अहमदाबादचा राजवीर वर्मा, स्थानिक पातळीवर आर्थिक व्यवहार सांभाळणारा अब्दुल फारुक मुकदम शाह उर्फ फारुकी याच्यासह व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या भावेश चौधरी, भाविक पटेल, सतीश लाडे, वलय व्यास (सर्व रा. अहमदाबाद), अजय ठाकूर आणि मनवर्धन राठोडला अटक करण्यात आली. यात राजवीर व फारुकची ८ नोव्हेंबर रोजी, तर उर्वरित आरोपींची ६ नाेव्हेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
मेसला रोज हजारो रुपये रोख पुरवायचे, मेस चालकाची चौकशी
कॉल् सेंटरची मुख्य जबाबदारी सांभाळणाऱ्यांसह ११२ कर्मचाऱ्यांची जेवणाची, राहण्याची सर्व सोय टोळीचे सूत्रधार करायचे. त्यात तीन महिन्यांपासून या कॉल सेंटरवरील कर्मचाऱ्यांना एमजीएम परिसरातील एका खानावळीवरून डबे जात होते. विशेष म्हणजे, या खानावळ चालकाला रोजच्या रोज या सर्व १००पेक्षा अधिक डब्यांचे रोखीच्या स्वरुपात पैसे अदा होत होते. यामुळे खानावळ चालकही आश्चर्यचकीत झाला होता. या कॉल सेंटरचा पर्दाफाश झाल्यानंतर त्यालाही धक्का बसला. पाच दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याचा जबाब नोंदवल्याचे सुत्रांनी सांगितले.
११२ कर्मचाऱ्यांची जामीनासाठी धडपड
अटकेतील सर्व ११२ कर्मचाऱ्यांची पहिल्याच दिवशी अटकेचा अधिकार अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आता मात्र, त्यांनी जामीनासाठी धडपड सुरू केली आहे. सोमवारी त्यांच्या जामीनावर सुनावणी झाली. मात्र, सरकारी पक्षाने त्याला विरोध केला. गुन्हा गंभीर असून, तांत्रिक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींना जामीन मिळाल्यास हे पुरावे नष्ट करण्याची भीती असून, मुख्य सूत्रधारही अटक होणे बाकी असल्याची बाब सरकारी पक्षाने अधोरेखित केली. त्यानंतर न्यायालयाने सर्वांचा जामीन नाकारला.