औरंगाबादेत शालेय साहित्याचा बाजार फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:13 IST2018-06-07T00:12:18+5:302018-06-07T00:13:02+5:30
नवीन शैक्षणिक वर्षाला पुढील आठवड्यात प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत पालकांची गर्दी वाढू लागली आहे.

औरंगाबादेत शालेय साहित्याचा बाजार फुलला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नवीन शैक्षणिक वर्षाला पुढील आठवड्यात प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत पालकांची गर्दी वाढू लागली आहे. कपड्यावर जीएसटी लागल्याने गणवेशाच्या किमती वाढल्या आहेत. काही व्यापारी एमआरपीनुसार, तर काही व्यापारी एमआरपीपेक्षा कमी किमतीत वह्यांची विक्री करीत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरू झाल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. शहरात मागील काळात झालेल्या दंगलीमुळे बाजारपेठेला मोठा फटका सहन करावा लागला होता.
६० ते ७० टक्क्याने व्यावसायिक उलाढाल घटली होती; मात्र नवीन शैक्षणिक वर्ष व रमजान महिना यामुळे बाजारात चहलपहल वाढल्याने व्यापारी वर्गातही समाधान व्यक्त केले जात आहे.
गणवेश १२ टक्क्याने महागले
कपड्यांवर पूर्वी कोणताही टॅक्स नव्हता; मात्र आता ५ टक्के जीएसटी लागत आहे, तसेच मालवाहतूक भाडे वाढल्यामुळे १२ टक्क्याने गणवेश महाग झाले आहेत. बाजारात ६० टक्के गणवेश सोलापूर, तर ४० टक्के गणवेश भिवंडी येथून मागविले जातात.
सर्वसाधारण इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा हाफ शर्ट व हाफ पँट ३५० रुपयांत, फूल पँट व हाफ शर्ट ४५० रुपयांत मिळत आहे. १० वीच्या विद्यार्थ्यांचे फुलपँट व हाफ शर्ट ६०० रुपयांना मिळत आहे. इयत्ता पहिलीमधील विद्यार्थिनींचा गणवेश ३६० ते ४०० रुपये, तर १० वीतील विद्यार्थिनींचा पंजाबी ड्रेस गणवेश ४०० ते ४२५ रुपयांत विकला जात आहे. ब्लेझर ८०० ते १३०० रुपयांदरम्यान विकले जात आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, एक शाळा वगळता अन्य कोणत्याही शाळेने यंदा गणवेश बदलले नाहीत. हाच पालकांसाठी दिलासा.
वह्यांच्या किमतीत तफावत
बाजारपेठेत मुबलक प्रमाणात वह्या उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, काही स्टेशनरी विक्रेते एमआरपीनुसार तर काही विक्रेते एमआरपीपेक्षा कमी किमतीत वह्या विकत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच २४ बाय १८ सें.मी. व २७ बाय १७ सें.मी आकारातील वह्या विकल्या जातात. मात्र, पहिल्यांदाच बाजारात २०.३ बाय २५.५ सें.मी. आकारातील वह्या आल्या आहेत.
त्याही ठराविक दुकानातच मिळत आहे. बाजारातील किमतीपेक्षा या वह्यांची किंमतही अधिक आहे. मात्र, शाळांच्या सक्तीमुळे नाइलाजाने पालकांना या वह्या खरेदी कराव्या लागत असल्याचे दिसून येत
आहे.