आदर्श, यशस्विनी पतसंस्थेपाठोपाठ राधाई बँकेत घोटाळा; दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 20:00 IST2025-04-11T19:59:34+5:302025-04-11T20:00:08+5:30
आदर्श, यशस्विनी पतसंस्थेपाठोपाठ आधाने कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत

आदर्श, यशस्विनी पतसंस्थेपाठोपाठ राधाई बँकेत घोटाळा; दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : आदर्श पतसंस्था व यशस्विनी पतसंस्थेपाठोपाठ देविदास आधानेच्या मुलाच्या नावे असलेल्या राधाई अर्बन मल्टिपर्पज निधी लि. बँकेतील घोटाळ्याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल झाला आहे. अन्य पतसंस्थेप्रमाणेच या बँकेद्वारे देखील १३ महिन्यांच्या एफडीवर १२ टक्के व्याजाचे आमिष दाखवून देवीदासचा मुलगा पवन आधाने व व्यवस्थापक गणेश शिंदे यांनी ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.
अविनाश नारायण चौधरी (३६, रा. न्यू हनुमाननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. पवनची आई सविता आधाने हिच्या यशस्विनी महिला स्वयंसहाय्यता गटामार्फत त्यांना राधाई अर्बन बँकेत गुंतवणुकीवर १२ टक्के परताव्याचे आमिष दाखवले गेले होते. त्याचवेळी घराच्या विक्रीतून चौधरी यांना पैसे मिळाले होते. २४ ऑगस्ट २०२१ रोजी चौधरी यांनी आई अंजली चौधरी यांच्या नावाने दोन लाखांच्या दोन एफडी केल्या. स्वत:सह आई, भाऊ, पत्नी, बहीण, मावशी, मावस बहिणीच्या नावे लाखोंच्या एफडी केल्या. मात्र, मुदतीनंतरही त्यांना त्यांना पैसे देण्यास बँकेने नकार दिला. त्याचदरम्यान यशस्विनी पतसंस्थेवर गुन्हा दाखल होऊन राधाई बँकदेखील बंद झाली.
चौधरी यांच्या प्राथमिक तक्रारीवरून २० लाख ४७ हजारांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यात अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले आहे. त्यामुळे तक्रारदारांसह फसवणुकीची रक्कमही वाढेल, असे तपास अधिकारी प्रमोद देवकाते यांनी सांगितले.
असा आहे घटनाक्रम
-१२ जुलै, २०२३ रोजी अंबादाससह देवीदासवर २०२ कोटींच्या अपहरणाचा पहिला गुन्हा.
-७ ऑक्टोबर, २०२३ रोजी आदर्श घोटाळ्यात अटक असतानाच देवीदासच्या यशस्विनी महिला गट सहकारी पतसंस्थेतही ४७ कोटी ८२ लाखांचा घोटाळा उघड.
-११ ऑक्टोबर, २०२३ राेजी देवीदास, त्याची पत्नी सविताला अटक.
-२ नोव्हेंबर, २०२३ रोजी यशस्विनीच्या घोटाळ्यात दुसऱ्यांदा अटक.
-११ नोव्हेंबर २०२४ रोजी मुलगा पवन व सुनेला अटक.
आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांचे पथकाने यशस्विनी घोटाळ्याचा तपास केला. नोव्हेंबर, २०२४ अखेरीसपर्यंत एकट्या आधाने कुटुंबाची २३ कोटींच्या संपत्तीची माहिती प्राप्त झाली होती. त्यापैकी १० कोटींची संपत्ती आदर्शच्या संपत्तीत जोडण्यात आली आहे.