सवन वाळू उपसा; तलाठी, मंडल अधिकारी निलंबित, तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यास नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:29 IST2025-06-05T12:28:50+5:302025-06-05T12:29:24+5:30

लोकमत इम्पॅक्ट: कलेक्टर स्वत: सकाळीच सवनला; वाळूघाट केला सील, १ लाख ब्रास वाळू उपसल्याची शक्यता

Sawan sand extraction; Talathi, divisional officer suspended, notice issued to Tehsildar, sub-divisional officer | सवन वाळू उपसा; तलाठी, मंडल अधिकारी निलंबित, तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यास नोटीस

सवन वाळू उपसा; तलाठी, मंडल अधिकारी निलंबित, तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यास नोटीस

छत्रपती संभाजीनगर : शिवना नदीच्या पात्रातील सवन या राखीव वाळूपट्ट्यातून कंत्राटापेक्षा अधिक वाळू उपसा केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणताच, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पथकसह बुधवारी सकाळी तेथे पोहोचले. परिस्थिती पाहून त्यांनी जागेवरच संबंधित तलाठी, मंडल अधिकारी यांना निलंबित केले तर तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यास ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ९ हजार ६०० ब्रास वाळू उपसण्याचा ठेका ६३ लाख ६० हजार रुपयांच्या रॉयल्टीने घेतला. परंतु त्या पट्ट्यातून बेकायदेशीररीत्या जास्तीची वाळू उपसून ती खुल्या बाजारात बोगस चालानच्या आधारे विक्री केली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित केले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सकाळीच वाळूपट्टा गाठला. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना सोबत घेऊन त्यांनी वस्तुस्थिती मोबाईलमध्ये कैद केल्यानंतर वाळूपट्टा सील करून पंचनामा केला.

ईटीएस मोजणी करून बेकायदेशीर किती वाळू उपसली, त्याचे मूल्यांकन करण्याचे आदेश स्वामी यांनी दिले. सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. एक नावाला लावला आहे. रजिस्टर नाही. जे आहे ते प्रमाणित नाही. मजिप्राचा अभियंता १:३० वाजता आला. त्याने पंचनाम्यावर सह्या केल्या नाहीत. वाळू ठेका तुमच्या योजनेसाठी दिलेला आहे तेथे तुमचा अभियंता का नेमला नाही? किती वाहने गेली? वाळू कुठे गेली? याची नोंद कुठे ठेवली आहे काय, अशी प्रश्नांची सरबत्तीच गोरड यांनी केली. नेमलेल्या कंत्राटदारांना सूचना दिल्या होत्या, असे अभियंत्याने मोघम उत्तर दिले. पंचनाम्यात याची नोंद घेतली असून प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांचे निलंबन करण्याचीही नोंद पंचनाम्यात झाली. घाटाची मोजणी झाली. ईटीएस मोजणी पूर्ण केली आहे. १ ऐवजी १० मीटरपर्यंत वाळूचे उत्खनन केले आहे. ६५०० ब्रास वाळू बुधवारी पथकाने जप्त केली. ९६०० ब्रास वाळू जीवन प्राधिकरणाला हवी होती, असे पथकप्रमुखांनी सांगितले.

दोघे निलंबित, दोघांना नोटीस
तलाठी उज्ज्वला ठोंबरे, मंडल अधिकारी सुभाष वाघ यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तहसीलदार नवनाथ वाघवाड व उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. जीवन प्राधिकरण मोजणीचा अहवाल येताच किती वाळू जास्तीची उपसली, त्याचा दंड प्राधिकरणावर लावला जाणार आहे. हा सगळा प्रकार पाणीपुरवठा सचिवांकडे लेखी पाठवू.
दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

गौण खनिज अधिकाऱ्याची बदली
गौण खनिज अधिकारी किशोर घोडके यांची मंगळवारी कोल्हापूरला बदली झाली, मात्र त्यांना कार्यमुक्त केले नव्हते. परंतु त्यांनी स्वत:ला शासनाकडूनच कार्यमुक्त करवून घेतले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घोडके यांना चांगलेच फैलावर घेतले.

Web Title: Sawan sand extraction; Talathi, divisional officer suspended, notice issued to Tehsildar, sub-divisional officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.