सातारा-देवळाईतील विकास निधीला अखेर मुहूर्त मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 19:09 IST2018-04-02T19:08:59+5:302018-04-02T19:09:37+5:30
सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना पैसे नसल्याचे कारण सांगून मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या मनपा प्रशासनाने त्यांच्याच साडेआठ कोटी रुपये विकास निधीतून रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा-देवळाईतील विकास निधीला अखेर मुहूर्त मिळाला
औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना पैसे नसल्याचे कारण सांगून मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या मनपा प्रशासनाने त्यांच्याच साडेआठ कोटी रुपये विकास निधीतून रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. दीड-दोन वर्षांपासून दडवून ठेवलेल्या विकास निधीला अखेर मुहूर्त मिळाल्याने तो बाहेर आला आहे. मात्र, या निधीतून पूर्वीच कामे झाली असती तर नागरिकांना दिलासा मिळाला असता. स्वत:चा एकही रुपया खर्च न करता आपलीच बोटे आपल्या डोळ्यात घालण्याचा मनपा खेळ खेळत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सातारा-देवळाई सिडको झालर क्षेत्रात येत असल्याने या भागातील रेखांकन व बांधकाम परवानगीचा जवळपास १३ कोटी ४७ लाख, ८ हजार ४२० रुपयांचा विकास निधी सिडको प्रशासनाकडे जमा होता. सातारा-देवळाईचा मनपात समावेश होताच सिडको प्रशासनाने नोव्हेंबर २०१६ मध्ये आपली येणे असलेली रक्कम वजा करून ८ कोटी ६७ लाख ९३ हजार ७५१ रुपये एवढा विकास निधी मनपाकडे सुपूर्द केला. हा निधी खर्च करून या भागातील नागरी समस्या सोडवाव्यात, अशी मागणी येथील रहिवाशांकडून वारंवार केली जाते; पण दीड वर्षापासून निधी पडून असतानाही मनपाने या भागातील विकासकामांवर एक दमडीही खर्च केला नाही.
मागणी करूनही विकासकामे होत नसल्याने नागरिकांची प्रशासनाविषयी ओरड सुरूहोती. वाढता रोष लक्षात घेऊन मनपाने या भागातील रस्त्याचा मुख्य प्रश्न असल्याने ८.६७ कोटीतून केवळ रस्ते करण्याचा निर्णय घेतला. ६ रस्त्यांचे काम मंजूर करून त्यातील ५ रस्ते कामाच्या निविदा काढल्या आहेत. सिडकोकडून पैसे मिळूनही महापालिकेने दीड-दोन वर्षांपासून तसेच दाबून ठेवले. हा निधी पूर्वीच खर्च करून विकासकामे केली असती, तर या भागातील समस्या काही महिन्यांपूर्वीच सुटल्या असत्या आणि नागरिकांना दिलासा मिळाला असता. उशिरा का असेना महापालिकेला शहाणपण सुचले असून, किमान त्यांचाच निधी त्या भागात खर्च करून विकासकामे करण्याचा निर्णय घेतला.
साडेआठ कोटींतून हे होणार डांबरी रस्ते
- रेणुकामाता मंदिर ते अहिल्यादेवी होळकर चौक (२ कोटी ६४ लाख ६४ हजार ३४४ रुपये)
- नाईकनगर ते विनायकनगर (१ कोटी ६१ लाख ६ हजार ४९५ रुपये)
- हॉटेल शिदोरी ते प्रकाश महाजन यांचे घर (८५ लाख ३ हजार २१० रुपये)
- घराना फर्निचर ते प्रवीण कुलकर्णी यांचे घर (१ कोटी ४९ लाख ८९ हजार ६५४ रुपये)
- साईनगर ते अलोकनगर (५६ लाख ५६ हजार ८२३ रुपये)
- कमलनयन बजाज हॉस्पिटल बीड बायपास ते सुधाकरनगर (२.१२ कोटी)