सातारा-देवळाई परिसर चार वर्षांनंतरही विकासापासून दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 18:20 IST2019-08-31T18:19:12+5:302019-08-31T18:20:19+5:30
महानगरपालिकेत समाविष्ट होऊन पाच वर्षांकडे वाटचाल होत असलेल्या सातारा-देवळाई परिसरात काहीही बदल झालेला नाही. ग्रामपंचायतीच्या साधनावरच मनपाची मदार आहे.

सातारा-देवळाई परिसर चार वर्षांनंतरही विकासापासून दूरच
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : सातारा-देवळाई चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट होऊनदेखील मनपा प्रशासन कोणत्याही ठोस भूमिकेवर नसल्याने या भागातील रहिवाशांची फरपट सुरू आहे. मूलभूत सुविधांसाठी नागरिकांनी मनपाकडे पाठपुरावा केला. आंदोलन केले; परंतु त्यांच्या आंदोलनाला चिरडण्यात आले. दरवेळी केवळ आश्वासनांची बोळवण केली जात आहे. प्रत्यक्षात सुविधा पुरविण्यात येत नाहीत. ‘साताऱ्याची तऱ्हा’ या मालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात दडलेल्या प्रश्नांना ‘लोकमत’मधून वाचा फोडण्याचा हा प्रयत्न.
सातारा-देवळाई या दोन्ही गावांतील परिसरातील वाढत्या लोकसंख्येनुसार सेवा-सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायती अपुऱ्या ठरत असल्याने सातारा-देवळाई ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून नगर परिषद स्थापन करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना बदल होईल असा आशावाद निर्माण झाला होता. २५ वॉर्डांची रचना करून निवडणुकीच्या तयारीला लागलेली नगर परिषद राजकीय हेतूपोटी रद्द करून मनपात समाविष्ट करण्यात आली. त्यावेळी नागरिकांनी विरोध दर्शविला; परंतु त्याचा फायदा झाला नाही. नगर परिषदेकडूनही तुम्हाला सेवा-सुविधा पुरविल्या जाऊ शकत नाहीत. मनपाच्या कार्यक्षेत्रालगत असल्याने विकासासाठी सोयीचे ठरणार आहे, असे नागरिकांना राजकीय नेत्यांनी सांगितले. २५ वॉर्डांचे फक्त दोनच वॉर्ड तयार झाले आणि निवडणुका पार पडल्या; परंतु आतापर्यंत एकाही प्रश्नाची सोडवणूक मनपाने केलेली नाही.
शिष्टमंडळाला आश्वासनांची खैरात
गत चार वर्षांपासून सतत भांडणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण मनपा आयुक्त व महापौर यांच्याकडून झालेले नाही. ग्रामपंचायतीच्या काळातील यंत्रणेवरच सर्व काही आजही सुरू आहे. आठवड्यात नागरिकांचे एक शिष्टमंडळ निवेदन घेऊन जाते आणि फक्त आश्वासनांची खैरात घेऊन येते. प्रत्यक्षात काम करण्यावर ठेकेदार अथवा प्रतिनिधीदेखील लक्ष देत नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर आहे. पाच वर्षांत खासदार व आमदार निधी या भागातच खर्च झाला नसल्याने एकही नवीन काम झाले नाही. ग्रामपंचायतीच्या काळात मोफत टँकरचे पाणी नागरिकांना मिळत होते. मनपात आल्यावर त्या टँकरच्या पाण्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे नागरिकांत मनपाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. पैठण रोड महानुभव आश्रम ते देवळाईपर्यंत एकाही कॉलनीचा कायापालट करण्यावर लक्ष देण्यात आलेले नाही. खेड्यातून शहरात आल्यावर बदल होईल, असे स्वप्न नागरिकांनी बाळगले होते. चार वर्षांनंतरही त्याची पूर्तता झालेली दिसत नाही. किरकोळ प्रश्नांसाठी जनआंदोलनाशिवाय जनतेला दुसरा पर्याय राहिलेला नाही. अजून किती दिवस विकासापासून कोसोदूर ठेवणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रेंगाळलेले प्रश्न
- पाऊणलाखाच्या वर लोकसंख्या
- चार वर्षांत ठोस कामाची पूर्तता नाही
- रस्त्यांची कामे मंजूर; पण कासवगतीने सुरू
- टोलेजंग घरे बांधली; परंतु सेवा-सुविधांपासून कोसोदूर
- पाण्यासाठी आजही नागरिकांची भटकंती