"...तर 'पालकमंत्री' नक्कीच होईन!" जंजाळांचा शिरसाटांना टोला, शहरात 'भावी मुख्यमंत्री' पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 18:49 IST2026-02-13T18:46:21+5:302026-02-13T18:49:30+5:30
मंत्री संजय शिरसाटांच्या खोचक शुभेच्छांवर जंजाळांचा सर्जिकल स्ट्राईक; शहरभर 'भावी मुख्यमंत्री' पदाचे पोस्टर्स

"...तर 'पालकमंत्री' नक्कीच होईन!" जंजाळांचा शिरसाटांना टोला, शहरात 'भावी मुख्यमंत्री' पोस्टर
छत्रपती संभाजीनगर: शिंदेसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील वाद आता शब्दांच्या मर्यादा ओलांडून थेट संघर्षाच्या वळणावर आला आहे. शिरसाट यांनी जंजाळ यांना 'भावी मुख्यमंत्री' होण्याच्या खोचक शुभेच्छा दिल्यानंतर, जंजाळ यांनी "तुमची इच्छा असेल तर मी पालकमंत्री नक्कीच होईन," असे म्हणत पालकमंत्र्यांना त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.
उपमहापौर पदासाठी संजय शिरसाट आपल्या कन्या हर्षदा शिरसाट यांना संधी देऊ पाहत होते, असा दावा जंजाळ यांनी केला होता. त्यावर शिरसाट यांनी "जंजाळ मुख्यमंत्री व्हावेत," असे उपरोधिक विधान केले. या टीकेचा समाचार घेताना जंजाळ म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिली तेव्हा हर्षदा शिरसाट यांनी फॉर्म भरण्याची तयारी केली होती, मात्र पक्षाच्या व्हीपमुळे त्यांना माघार घ्यावी लागली. मी पक्षात झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे, म्हणूनच मला हे पद मिळाले आहे."
शहरात 'भावी मुख्यमंत्री' पदाचे पोस्टर्स
दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात रंगलेल्या या वादानंतर सायंकाळी त्याचे पडसाद शहराच्या चौकाचौकात उमटले. जंजाळ समर्थकांनी आणि युवा सेनेचे पदाधिकारी आदित्य दहीवाळ यांनी शहरात 'भावी मुख्यमंत्री राजेंद्र जंजाळ' अशा आशयाचे पोस्टर्स लावून पालकमंत्र्यांना उघडपणे आव्हान दिले. या पोस्टर वॉरमुळे राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून, सोशल मीडियावरही या वादाचे पडसाद उमटत आहेत.
अंतर्गत संघर्षाचा भडका
जंजाळ यांनी केवळ शिरसाटांच्या टीकेला उत्तर दिले नाही, तर आगामी काळात पालकमंत्र्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचे संकेतही दिले आहेत. गटनेते पदावरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक प्रतिष्ठेपर्यंत पोहोचला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.