'...तर नेत्यांना बुरखा घालून फिरावं लागेल'; खरात प्रकरणावरून शिरसाटांचे विरोधकांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 18:34 IST2026-03-21T18:34:02+5:302026-03-21T18:34:55+5:30
भोंदू बाब अशोक खरातच्या साम्राज्याची चौकशी करा; संजय शिरसाट यांची आक्रमक मागणी

'...तर नेत्यांना बुरखा घालून फिरावं लागेल'; खरात प्रकरणावरून शिरसाटांचे विरोधकांना प्रत्युत्तर
छत्रपती संभाजीनगर: "राजकारणात अनेक लोकांशी संपर्क येतो, कुणाच्या मनात काय चालले आहे हे कपाळावर लिहिलेले नसते. केवळ फोटोवरून नेत्यांनी राजीनामे द्यायचे असतील, तर यापुढे नेत्यांना मंत्रालयात बुरखा घालून फिरावे लागेल," अशा शब्दांत आमदार संजय शिरसाट यांनी भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे.
खरातचा 'राम रहिम' होणार!
कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर बोलताना शिरसाट म्हणाले की, "धर्माच्या नावाखाली चाललेला हा प्रकार म्हणजे कलंक आहे. खरातची संपत्ती ५०० कोटींची कशी झाली? त्याने लोकांना ब्लॅकमेल करून हे पैसे मिळवले का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. खरातची अवस्था 'राम रहिम' सारखी झाल्याशिवाय राहणार नाही, त्याला अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागतील."
संजय राऊत हेच मोठे 'जादुगार'
खासदार संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेताना शिरसाट यांनी त्यांनाच 'जादुगार' संबोधले. "संजय राऊत यांनीच ठाकरेंची सत्ता उलटवून टाकली आणि पक्ष बुडवला. इतरांवर आरोप करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या आजूबाजूला काय घडतेय ते पहावे. जादू-टोण्याने कोणी मुख्यमंत्री होत नाही, हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
अवकाळीग्रस्तांना मदत आणि ॲट्रॉसिटी पीडितांना न्याय
मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसावर बोलताना शिरसाट यांनी स्पष्ट केले की, दोन-तीन दिवसांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली जाईल. तसेच, ॲट्रॉसिटी पीडित ८८९ लोकांना नोकरीत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा मानस असून, पहिल्या टप्प्यात १०० लोकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. लवकरच नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथेही ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.