कष्ट तेवढेच पण मजुरीत भेदभाव; पुरुष कामगारांना ७००, तर महिलांना फक्त ३०० रुपये रोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 19:00 IST2025-05-02T18:59:19+5:302025-05-02T19:00:03+5:30
कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याचे या महिला कामगारांनी सांगितले.

कष्ट तेवढेच पण मजुरीत भेदभाव; पुरुष कामगारांना ७००, तर महिलांना फक्त ३०० रुपये रोज
- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : कामगारांच्या गर्दीने गजबजलेला कामगार चौक. सर्वत्र वाहनांची आणि माणसांची वर्दळ. त्यातच एका बाजूला घोळका करून बसलेल्या महिला कामगार. तुमचा रोज काय, असा प्रश्न जेव्हा ‘लोकमत प्रतिनिधी’ने त्यांना विचारला तेव्हा त्या म्हणाल्या, ‘४० रुपये रोजापासून सुरुवात करत आता कुठे ४०० वर येऊन पोहोचलोय.’ पुरुषांपेक्षा कमी रोज का? यावर डोळ्याला पदर लावत त्या म्हणाल्या, पुरुष ठेकेदार म्हणतात की, ‘बायका माणसाएवढं काम करतात का?’
समान वेतन हक्क कायदा देशात लागू आहे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी दिसत नाही. कामगार दिनानिमित्त ‘लोकमत’ने शहरातील कामगार चौक आणि लेबर नाक्यावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी महिला कामगारांना पुरुषांपेक्षा कमी वेतन असल्याचे दिसून आले. जिथे पुरुष कामगारांना ७०० ते १००० रुपये रोज आहे, तिथे महिला कामगारांना ३०० ते ५०० रुपये रोज मिळतो. कामगार चौकातल्या महिला कामगार या बिगारी काम करतात. कामगार चौकातील पुरुष कामगार सिद्धार्थ चरेकर म्हणाले, महिला पुरुष कामगारांपेक्षा कोणतेही काम व्यवस्थित करतात. तरीही त्यांना वेतन कमी का, याचे उत्तर आमच्याकडे नाही.
कधी काम भेटते तर कधी नाही
१५ वर्षे कामगार म्हणून मी काम करत आहे. बायामाणसांना कुठे एवढी हजेरी असते का, असा प्रश्न ठेकेदार विचारतात. आम्ही रोज नाक्यावर येऊन बसतो. कधी काम मिळते तर कधी नाही.
- गयाबाई प्रधान, मजूर
कालही तीच अवस्था
६० रुपये हजेरी होती तेव्हापासून मी बिगारी काम करते. आता ३०० ते ५०० रुपयांपर्यंत हजेरी मिळते. आमच्या अडचणींकडे कोणीही लक्ष देत नाही.
- जुलेखाँ पठाण, मजूर
जड काम अवघड
महिला कामगारांना पूर्वी फारच कमी वेतन होते. आता थोडे वाढले आहे. ठेकेदार म्हणतात, महिला जड गोण्या उचलू शकत नाहीत. विटांचे टोपलेच्या टोपले नेणे त्यांना जमत नाही.
- काशीनाथ उघडे, कोषाध्यक्ष, कामगार संघटना
सरकारी योजना कागदावरच
कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ या महिला कामगारांना मिळत नसल्याचे महिलांनी सांगितले. उषा थाठे, मीना शेजूळ, शारदा वैद्ये, ज्योती कसबे या महिला कामगार म्हणाल्या, कामगारांसाठीच्या कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ आम्हाला मिळालेला नाही. सरकारी कर्मचारी एकदा भेटतात. नंतर तोंडही दाखवत नाहीत.