जप्त वाळूचा होणार लिलाव...!
By Admin | Updated: August 13, 2015 00:20 IST2015-08-13T00:02:56+5:302015-08-13T00:20:59+5:30
जालना : जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात अवैध वाळू उपसा व अवैध वाहतुकीवर काही दिवसांपासून केलेल्या कारवाईत सुमारे ८ हजार ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.

जप्त वाळूचा होणार लिलाव...!
जालना : जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात अवैध वाळू उपसा व अवैध वाहतुकीवर काही दिवसांपासून केलेल्या कारवाईत सुमारे ८ हजार ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. या साठ्याचा लवकरच लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जालना जिल्ह्यात विशेषत: अंबड व घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदी किनाऱ्यावरील विविध गावांतील शिवारातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. महसूल प्रशासनाने वेळोवेळी यावर कारवाई केलेली आहे. या कारवाईतील मोठा साठा त्या त्या भागात साठवून ठेवण्यात आलेला आहे.
घनसावंगी तालुक्यातील भादली येथील गायरान जमिनीवर नदीकाठावर तसेच सदानंद महाराज मंदिर परिसरात सुमारे अडीच हजार ब्रास वाळूचा साठा ठेवलेला आहे.
अंबड तालुक्यातील गोंदी परिसरात विविध ठिकाणी सुमारे साडेपाच हजार ब्रास वाळूचा साठा आहे. याची किमंत सुमारे ५० लाखांवर आहे. त्याच्या लिलावातून प्रशासनाला मोठा महसूल प्राप्त होणार असून, १२ आॅगस्ट पासून लिलावाच्या निविदेची प्रकिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
जालना तहसील कार्यालयाने मागील काही महिन्यांत अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई करून वाळू जप्त केली होती. ही वाळू तहसील कार्यालय आवारात मोठ्या प्रमाणात जमा झालेली आहे. अंबड आणि घनसावंगी येथील जप्त वाळूचा लिलाव झाल्यानंतर जालन्यासह जिल्ह्यातील अन्य काही ठिकाणी जप्त केलेल्या वाळूचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)