पालघरनंतर महाराष्ट्रात पुन्हा साधूंवर हल्ला; सताळा आश्रमाच्या महाराजांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 06:59 IST2020-11-14T01:19:23+5:302020-11-14T06:59:13+5:30
फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पालघरनंतर महाराष्ट्रात पुन्हा साधूंवर हल्ला; सताळा आश्रमाच्या महाराजांना मारहाण
फुलंब्री ( जि. औरंगाबाद ) : सताळा येथे चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या आश्रमातील प्रियशरण महाराजांना अज्ञात सात ते आठ लोकांनी मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली असून, फुलंब्री ठाण्यात याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. पालघरमध्ये साधूंवर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आला आहे.
सताळा गावच्या हद्दीत उंच डोंगरावर प्रियशरण महाराजांचा भव्य आश्रम आहे. मंगळवारी मध्यरात्री अज्ञात ७ ते ८ व्यक्तींनी आश्रमाचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. झोपेत असलेल्या महाराजांना उठवून त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. महाराजांच्या डाव्या दंडावर चाकूने वार करून जखमी केले. यानंतर आरोपींनी तेथून काढता पाय घेतला.
हल्लेखोरांनी केवळ प्रियशरण महाराजांनाच मारहाण केली आहे. त्यांनी आश्रमातील एकही वस्तू सोबत नेली नाही. याचा अर्थ ते चोरीच्या उद्देशाने तेथे आले नव्हते, यामुळे या घटनेमागे वेगळेच कारण असू शकते, अशी शंका पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी व्यक्त केली आहे.