एस. टी. महामंडळाला पांडुरंग पावला
By Admin | Updated: July 28, 2015 01:21 IST2015-07-28T00:47:09+5:302015-07-28T01:21:46+5:30
औरंगाबाद : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी एस. टी. महामंडळाच्या औरंगाबाद विभागातून ११३ जादा बसेस सोडण्यात झाल्या.

एस. टी. महामंडळाला पांडुरंग पावला
औरंगाबाद : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी एस. टी. महामंडळाच्या औरंगाबाद विभागातून ११३ जादा बसेस सोडण्यात झाल्या. या जादा बसेसच्या नियोजनातून मिळालेल्या उत्पन्नाचा आकडा अद्याप प्राप्त झालेला नाही. परंतु यंदा जवळपास ७ लाख रुपये उत्पन्न मिळण्याचे अपेक्षित असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यंदा एस. टी. महामंडळाला पांडुरंग पावल्याचे दिसत आहे.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानकासह सिल्लोड, वैजापूर, कन्नड, गंगापूर, सोयगाव आगारांतून पंढरपूरसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या. पावसाने पाठ फिरविल्यामुळे यंदा भाविकांची गर्दी कमीच राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी रविवारी बसस्थानकात पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी झाली. औरंगाबाद विभागातून रविवारी दिवसभरात ५९ जादा बसेस रवाना झाल्या. ७८ जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु भाविकांच्या गर्दीने प्रत्यक्षात जादा बसेसचा आकडा सोमवारपर्यंत ११३ वर पोहोचला. एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक निरीक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी जादा बसेसच्या नियोजनासाठी प्रयत्न केले.
प्रतिपंढरपूरसाठी जादा १२ बसेस
शहराजवळील वाळूज येथील प्रतिपंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी महामंडळातर्फे १२ जादा शहर बसेस सोडण्यात आल्या. भाविकांच्या गर्दीनुसार विविध भागांतून या बसेस सोडण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या अधिकऱ्यांनी दिली.