खुलताबादमध्ये मध्यरात्री ईव्हीएम मशीन हलवल्याची अफवा; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जुंपली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 18:36 IST2025-12-05T18:31:39+5:302025-12-05T18:36:02+5:30

मतमोजणी पुढे ढकलल्याने तणाव वाढला, एका अफवेमुळे शेकडो कार्यकर्त्यांची धावपळ

Rumors of EVM machine being moved in Khultabad; Police and activists clash at midnight! | खुलताबादमध्ये मध्यरात्री ईव्हीएम मशीन हलवल्याची अफवा; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जुंपली!

खुलताबादमध्ये मध्यरात्री ईव्हीएम मशीन हलवल्याची अफवा; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जुंपली!

- सुनील घोडके
खुलताबाद:
न्यायालयाच्या आदेशामुळे नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली गेल्याने आधीच चिंतेत असलेल्या खुलताबादच्या राजकीय वातावरणात गुरुवारी रात्री मोठी खळबळ उडाली. नगरपरिषद कार्यालयातील स्ट्रॉंगरूममधून ईव्हीएम मशीन बॅगेत भरून हलवल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे उमेदवार आणि शेकडो कार्यकर्त्यांनी नगरपरिषद कार्यालय आणि पोलीस ठाण्याकडे मध्यरात्रीपर्यंत धाव घेतल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

रात्री १० वाजता नेमके काय घडले?
खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीत विक्रमी ८२.२६ टक्के मतदान झाले आहे आणि सर्व ईव्हीएम मशीन नगरपरिषद कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री १० वाजता स्ट्रॉंगरूमच्या बंदोबस्तासाठी असलेले राखीव पोलीस दलाचे जवान अमरावती येथे जाण्यासाठी आपले सामान (बॅगा) पोलीस व्हॅनमध्ये टाकत होते. याच वेळी, एका अज्ञाताने फोनवरून 'ईव्हीएम मशीन मोठ्या बॅगेत भरून पोलीस घेऊन जात आहेत,' अशी अफवा पसरवली.

अफवा पसरल्याने रात्रीची धावपळ
ही अफवा ऐकताच निवडणुकीत उतरलेले विविध पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे शेकडो समर्थक तात्काळ नगरपरिषद कार्यालयाजवळ जमा झाले. पोलीस व्हॅनमध्ये बॅगा टाकत असल्याचे पाहताच पदाधिकाऱ्यांनी थेट जवानांना अडवले आणि बॅगा तपासण्याची मागणी केली.

पोलीस आणि जवानांतच जुंपली!
राखीव पोलीस दलाच्या जवानांनी सुरुवातीला बॅगेत कपडे आणि वैयक्तिक सामान असल्याचे सांगत बॅगा दाखवण्यास नकार दिला. यामुळे ईव्हीएम मशीन हलवल्याचा संशय कार्यकर्त्यांमध्ये अधिकच बळावला. संतप्त पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती खुलताबाद पोलिसांना दिली. सर्व जमाव नंतर पोलीस ठाण्यावर पोहोचला. पोलीस ठाण्यात खुलताबाद पोलिसांनी राखीव दलाच्या जवानांना बॅगा उघडून दाखवण्यास सांगितले. बॅगा उघडल्यावर त्यात ईव्हीएम नसून जवानांचे वैयक्तिक कपडे व साहित्य असल्याचे उघड झाले. परंतु, या वेळी राखीव पोलीस दलाचे जवान आणि खुलताबाद पोलीस यांच्यातच चांगलीच शाब्दिक चकमक झाली. हा सर्व घटनाक्रम मध्यरात्री १२:३० पर्यंत चालला होता. 

मतमोजणी पुढे ढकलल्याने चिंता
न्यायालयाच्या आदेशामुळे मतमोजणीची तारीख ३ डिसेंबरवरून थेट २१ डिसेंबरवर गेली आहे. मतमोजणी पुढे ढकलल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिंदेसेनेचे उमेदवार 'काही गडबड घोटाळा होतो की काय' या चिंतेत आहेत. त्यामुळे हे सर्व उमेदवार आणि त्यांचे समर्थक दिवस-रात्र नगरपरिषद कार्यालयावर लक्ष ठेवून आहेत.

Web Title : खुलताबाद: ईवीएम अफवाह से पुलिस और कार्यकर्ताओं में आधी रात को झड़प

Web Summary : खुलताबाद में ईवीएम स्थानांतरित करने की अफवाहों से तनाव बढ़ गया, समर्थक जमा हो गए, जिससे पुलिस और कार्यकर्ताओं के बीच टकराव हुआ। स्थिति स्थगित मतगणना और निराधार संदेह के कारण उत्पन्न हुई।

Web Title : Khultabad: EVM rumor sparks midnight clash between police, activists.

Web Summary : Rumors of EVMs being moved in Khultabad caused tension as supporters gathered, leading to a confrontation between police and activists. The situation arose from postponed vote counting and unfounded suspicions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.