घाटीत ५० वर्षे जुन्या विद्यार्थ्यांच्या होस्टेलचे छत कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:30 IST2025-04-09T12:30:15+5:302025-04-09T12:30:29+5:30
वसतिगृहाची इमारत सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली असून, जागाेजागी दुरवस्था झालेली आहे.

घाटीत ५० वर्षे जुन्या विद्यार्थ्यांच्या होस्टेलचे छत कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली
छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे छत अचानक कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. मात्र या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वसतिगृहाची इमारत सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली असून, जागाेजागी दुरवस्था झालेली आहे. मंगळवारी सायंकाळी वसतिगृहाच्या मोकळ्या जागेतून स्वच्छतागृहाकडे जाणाऱ्या पोर्चच्या भागातील छत अचानक कोसळले. घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी तातडीने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी त्यांनी भेट देऊन कोसळलेल्या छताचा भाग हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार तत्काळ मलबा हटविण्यात आला.
नव्या वसतिगृहाची गरज
कोसळलेल्या छताच्या खालच्या भागाला आधार देण्याचे काम बुधवारी हाती घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था करत सुमारे ८ ते १० विद्यार्थ्यांना इतर मुलांच्या खोल्यांमध्ये राहण्याची सोय उपलब्ध करून दिली. हे वसतिगृह धोकादायक झाल्याने नव्या वसतिगृहाची गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले.
छताला तडे, विद्यार्थ्याला कपड्यांसाठी मदत
दुसऱ्या मजल्यावरील छत कोसळल्याने खालच्या मजल्याच्या छताला तडे गेले. वसतिगृहातील २१९ क्रमांकाच्या खोलीमध्ये पंकज आगळे हे जाऊ शकत नसल्याने त्यांना गावी जाण्यासाठी व नवे कपडे घेण्यासाठी डाॅ. सुक्रे यांनी दोन हजार रुपये देत काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले.