छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील दरोडा; टीप देण्याचे माहीतगाराचेच काम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 19:00 IST2025-05-17T18:59:11+5:302025-05-17T19:00:33+5:30
घरात झोपलेल्या चालक संजय झळके यांचे तोंड आणि हात-पाय बांधत छातीवर पिस्तूल ठेवून त्यांनी ५.५ किलो सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, ३२ किलो चांदीचे दागिने, ७० हजार रोख रक्कम लुटली.

छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील दरोडा; टीप देण्याचे माहीतगाराचेच काम?
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी पडलेल्या दरोड्याबाबत शुक्रवारीदेखील पोलिसांना ठोस पुरावे हाती लागले नाहीत. एखाद्या माहीतगाराच्या माहितीवरूनच हा दरोडा पडल्याचा धागा पकडून पोलिसांनी आता तांत्रिक तपासावर अधिक भर दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुरुवारी मध्यरात्री लड्डा यांच्या घरात सहा शस्त्रधारी दरोडेखोरांनी लूट केली. घरात झोपलेल्या चालक संजय झळके यांचे तोंड आणि हात-पाय बांधत छातीवर पिस्तूल ठेवून त्यांनी ५.५ किलो सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, ३२ किलो चांदीचे दागिने, ७० हजार रोख रक्कम लुटली. विशेष म्हणजे, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावरील वसाहतीत दोन तास ही लुटमार सुरू होती. ७ मे रोजी लड्डा पत्नी, मोठ्या मुलासह अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या मुलाच्या पदवीदान समारंभासाठी गेल्यानंतर ही घटना घडली.
तांत्रिक तपासावर भर
सुरुवातीला एमआयडीसी वाळूजचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्याकडे तपास होता. शुक्रवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे तपास सोपवला. त्यांना एमआयडीसी वाळूज पोलिस, सायबरची पथके मदतीस दिली. शुक्रवारी नऊपैकी एक पथक दरोड्यानंतर कार जाणाऱ्या मार्गावरील, तर दुसरे परतीच्या मार्गावरील फुटेज तपासत होते. १७० कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक तपासासाठी ३ पथकांचे सीडीआर, डंप डेटाचे विश्लेषण सुरू होते. उर्वरित दोन पथकांना संशयितांच्या चौकशीची जबाबदारी देण्यात आली. शिवाय, अशा प्रकारे दरोडा टाकणाऱ्या रेकॉर्डवरील टोळ्यांची माहिती घेणे सुरू होते.
वीसपेक्षा अधिकांची चौकशी
पोलिसांनी लड्डा यांच्या कंपनीतील वीसपेक्षा जास्त कामगारांची चौकशी केली. संजय झळके यांना दिवसभर प्रश्न विचारण्यात आले. दरोडेखोरांनी लंपास केलेला मोबाइल तांत्रिक तपासात कामगार चौकाच्या आसपास असल्याचे निष्पन्न झाले. दरोडेखोर लुधियाना ढाब्यापर्यंत गेले. तेथून पुढे ते कुठे गेले, हा प्रश्न अनुत्तरित राहिला. दरोडेखोरांनी घूमजाव केला कुठे, या प्रश्नामुळे शुक्रवारीही बजाजनगर, पाटोदा, वळदगावच्या ८ किलोमीटरमध्येच सीसीटीव्ही फुटेजचा तपास अडकला होता. लड्डा ७ मे रोजी अमेरिकेला गेले. दरोडेखोरांनी सहज कट रचून दरोडा टाकला. त्यांची प्रवेशाची जागादेखील ठरली होती. दरोडेखोरांच्या देहबोलीमुळे माहीतगाराच्या टीपवरूनच हा कट रचला गेल्याच्या धाग्यावर पोलिस तपासाचा भर आहे.