गंगापूरमधील वरखेड शिवारात दरोडा; शेतकरी कुटुंबाला मारहाण करून लाखोंचा ऐवज लुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:30 IST2025-03-03T13:25:44+5:302025-03-03T13:30:02+5:30
दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबास मारहाण करून गंभीर जखमी केले, बाप-लेक गंभीर जखमी

गंगापूरमधील वरखेड शिवारात दरोडा; शेतकरी कुटुंबाला मारहाण करून लाखोंचा ऐवज लुटला
गंगापूर: तालुक्यातील वरखेड शिवारात चोरट्यांनी औटे वस्तीवर सोमवारी (३) पहाटेच्या सुमारास दरोडा टाकला. यात दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबास मारहाण करून गंभीर जखमी केले. या दरोड्यात भामट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा सव्वा लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला.
वरखेड शिवारात गट क्रमांक २१३ मध्ये अशोक भानुदास औटे(वय ५५) हे कुटुंबासह वास्तव्यास असून सोमवारी(३) पहाटे ३:३० वाजता चार दरोडेखोरांनी त्यांच्या वस्तीवरील घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व अशोक औटे त्यांचा मुलगा,गणेश अशोक औटे(४०) सून सोनाली गणेश औटे(३५) नातू रुद्रा गणेश औटे(१४) यांना जबर मारहाण करून जखमी केले तसेच शस्त्राचा धाक दाखवून घरातील सोने,चांदी व रोख रक्कम असा सव्वा लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला.
बाप-लेक गंभीर जखमी
यावेळी चोरट्यांनी दरोड्यानंतर औटे कुटुंबाचे मोबाईल हिसकावून शेतात लांब फेकून दिले तसेच त्यांच्या शेतवस्तीवर लावलेल्या सुमारे अर्धा एकर टरबूजाची देखील नासाडी केली. अशोक औटे यांनी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाजूच्या शेतवस्तीवर जाऊन फोनद्वारे नातेवाईकांना घटनेबद्दल माहिती दिली. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत औटे कुटुंबातील अशोक व गणेश हे बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येऊन त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोनि सलीम चाऊस यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी पाहणी केली. दरोडेखोरांनी याच रात्री औटे वस्तीच्या बाजूला असलेल्या जंगले वस्तीवरील बंद घराचे कुलूप देखील तोडले. मात्र या वस्तीवर कोणीच राहत नसल्याने त्यांच्या हाताला काहीच लागले नाही