रामराई गावालगतच्या शिवारात एकटे घर हेरून दरोडेखोरांचा हैदोस, महिलांना जबर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:35 IST2025-05-20T16:31:43+5:302025-05-20T16:35:01+5:30

वाळूजपासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या रामराई गावालगतची घटना

Robbers break into a house alone in Shivara, severely beat up women | रामराई गावालगतच्या शिवारात एकटे घर हेरून दरोडेखोरांचा हैदोस, महिलांना जबर मारहाण

रामराई गावालगतच्या शिवारात एकटे घर हेरून दरोडेखोरांचा हैदोस, महिलांना जबर मारहाण

वाळूज महानगर : रामराई येथे रविवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत वाघमारे कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात ३ महिलांसह एका वृद्धास मारहाण करण्यात आली. सुमारे ४८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले. ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली.

वाळूजपासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या रामराई गावालगत स्मशानभूमी शेजारीच दिगंबर धोंडीबा वाघमारे (वय ५५) यांची शेती आहे. या शेतात वाघमारे कुटुंबीयांचा निवास असतो. त्या परिसरात त्यांचे एकमेव घर आहे. हे हेरूनच सात ते आठ अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी घराच्या दरवाजावर टकटक केली. खिडकीतून बाहेर पाहिल्यानंतर कोणीही न दिसल्याने घरातील तीन महिला बाहेर आल्या असता, दरोडेखोरांनी त्यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला केला. महिलांची आरडाओरड ऐकून इतर घरातील सदस्य जागे झाले. घरातील ज्येष्ठ दिगंबर वाघमारे यांना देखील डोक्यात दांड्याने मारहाण करण्यात आली. एकाने सुमनबाई यांच्या गळ्याला चाकू लावून पोत हिसकावून घेतली. महिलांना दमदाटी करत त्यांच्या गळ्यातील दागिने काढून घेण्यात आले. घरातील कपाटांची उचकापाचक करत दरोडेखोरांनी अंदाजे ४८ हजार रुपये किमतीचे दागिने लुटले. दरम्यान, दुसऱ्या खोलीत असलेले रामदास वाघमारे हे मागील दरवाजाने गावात जाऊन मदतीला शंकर वाघमारे यांना घेऊन परतले. तोपर्यंत दरोडेखोर फरार झाले होते. जखमींवर वाळूज येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, पोलिस निरीक्षक राजेंद्र शहाणे, पोलिस उपनिरीक्षक अजय शितोळे घटनास्थळी दाखल झाले. तसेच श्वान रॉकी आणि ठसे तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली आहे. रामदास वाघमारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आठ दरोडेखोरांविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जबर मारहाण, परिसरात भीतीचे वातावरण
घरातील तीन महिला संगीता वाघमारे, गायत्री वाघमारे आणि जान्हवी यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या आरडाओरडानंतर जागे झालेले वडील दिगंबर वाघमारे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या डोक्यातही लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. दरोडेखोरांकडे चाकू होता. गळ्याला चाकू लावूनच त्यांनी लुटमार केली.

नववीत शिकणाऱ्या प्रसादने केला दरोडेखोरांचा प्रतिकार
रामराई येथे रविवारी मध्यरात्री घरावर दरोडा टाकण्यात आला असताना, वाघमारे कुटुंबातील नववीत शिकणाऱ्या प्रसाद वाघमारे (वय १५) याने विलक्षण धाडस दाखवत एका दरोडेखोराला पकडून ठेवले होते. घरातील गोंधळ आणि आरडाओरड सुरू असताना प्रसाद झोपेतून उठला व त्याने एका दरोडेखोराला पकडून ठेवलं. त्याचे हे धाडस पाहून इतर दरोडेखोरांनी प्रसादवर दगडफेक केली. त्यामुळे त्याची पकड सुटली. प्रसादच्या या धाडसामुळे काही काळ दरोडेखोर गोंधळले होते.

Web Title: Robbers break into a house alone in Shivara, severely beat up women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.